सातारा : निवृत्त नौदल कमांडर कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी जावळीकर एकवटले आहेत. सायगाव भागातील युवकांनी ६ एप्रिलला निषेध मोर्चा काढून पाकच्या विरोधात घोषणा दिल्या. या वेळी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. ‘पाकिस्तान मुर्दाबाद’, ‘पाकिस्तान हाय-हाय’, ‘भारत सरकार आगे बढ़ो’ अशा या वेळी घोषणा दिल्या. मर्ढे, आनेवाडी, सायगाव, खर्शी, दरे खुर्द या गावातील असंख्य युवक यात सहभागी झाले होते. या शूरवीरासाठी सरकारने कडक पावले उचलून त्यांना पाकिस्तानच्या कह्यातून लवकरात लवकर सोडवून आणावे, अशी मागणी या वेळी उपस्थित युवकांनी केली.
निवृत्त कमांडर अधिकारी कुलभूषण जाधव हे तालुक्यातील आणेवाडीत शेती घेऊन तिथे घर बांधून काही काळ रहात होते. या काळात त्यांनी तरुणांमध्ये देशभक्तीचे संस्कार केले, असे ग्रामस्थांनी सांगितले.
भाजपचे जिल्हा परिषदेचे गटनेते दीपक पवार म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना कुलभूषण यांच्या सुटकेसाठी निवेदन पाठवणार आहोत.
जावळी शिवसेना प्रमुख प्रशांत तरडे म्हणाले की, भारत सरकारने कुलभूषण जाधव यांच्यासाठी प्रयत्न करून त्यांना भारतात परत आणावे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात