बीड : कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेली अयोध्यानगरी ही प्रभु श्रीरामाची जन्मभूमी आहे, यावर वर्ष २०१० मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयानेच शिक्कामोर्तब केले आहे; मात्र तरीही या पवित्र भूमीवर अद्याप हिंदूंना पूजा करण्यास अनुमती नाही. हिंदूबहुल भारतात श्रीरामजन्मभूमीवर हिंदूंना पूजा करण्याचा अधिकार नाकारला जाणेे, हिंदूंसाठी याहून मोठे दुर्दैव ते काय ! गेल्या १५ वर्षांत उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांच्या मुसलमानांच्या लांगूलचालनाच्या भूमिकेमुळे तेथे हिंदूंना पूजेचा अधिकार मिळू शकला नाही. आता केंद्रात आणि उत्तर प्रदेशात दोन्ही ठिकाणी भाजपचेच पूर्ण बहुमतातील शासन आहे. त्यामुळे हिंदूंना श्रीरामजन्मभूमीवर पूजा करण्यास विशेष अनुमती देण्याचा निर्णय घ्यावा, तसेच या प्रकरणी संसदेत श्रीराम मंदिर उभारणी संदर्भातील कायदा बनवून त्याच्या आधारे अयोध्येत भव्य श्रीराम मंदिर उभारण्यास प्रारंभ करावा, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले. या वेळी जिल्हाधिकार्यांच्या ऐवजी त्यांचे प्रतिनिधी श्री. देशपांडे यांनी ते स्वीकारले.
या वेळी राष्ट्रवादी विद्यार्थी परिषदेचे जिल्हाध्यक्ष श्री. महेश धांडे, जगदंब ग्रुपचे श्री. सचिन आगे, श्री. सुमित धांडे, युवा सेनेचे श्री. स्वप्नील पिंगळे, श्री. अनंत गर्जे, श्री. किरण आमटे, श्री दिशांत भारती, रा.स्व. संघाचे श्री अभिषेक राजहंस, सनातन संस्थेचे श्री. हिरालाल तिवारी आणि हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री भास्करराव हुंबे, बाप्पू बहिरवाल, दिनेश ढेंगे, मनोज छाजेड आदी उपस्थित होते.
या वेळी करण्यात आलेल्या अन्य मागण्या
१. महाराष्ट्र शासनाने अर्थसंकल्पामध्ये केवळ अल्पसंख्यांकांच्या पायाभूत सुविधांसाठी कोट्यवधी रुपयांची केलेली तरतूद रहित करून अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण थांबवावे.
२. अंदमान-निकोबार बेटांसह, देशभरातील शहरे, वास्तू, रस्ते, स्थानके आदींची परकीय आक्रमकांनी पालटलेली आणि परकियांच्या नावे अद्याप असलेली नावे पुन्हा मूळ हिंदु नावांनी नामांतरित करावीत.
३. देशभरातील घुसखोर रोहिंग्या मुसलमानांना देण्यात येणार्या सर्व सुविधा तात्काळ थांबवून त्यांना देशाबाहेर हाकलून लावावे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात