जयपूर (राजस्थान) : येथील श्री रजपूत करणी सेनेचे संस्थापक श्री. लोकेंद्रसिंह कालवी यांची हिंदु जनजागृती समितीचे राजस्थान समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी नुकतीच भेट घेतली. समितीच्या वतीने चाललेल्या विविध उपक्रमांची माहिती त्यांना देण्यात आली. तसेच गोवा येथे होणार्या ६ व्या ‘अखिल भारतीय हिंदु अधिवेशना’चे निमंत्रणही त्यांना देण्यात आले. श्री. लोकेंद्रसिंह कालवी यांनी समितीच्या कार्याची प्रशंसा करून व्यस्त कार्यक्रमातून अधिवेशनाला येण्याची इच्छा प्रकट केली. अखिल भारतीय हिंदु अधिवेशनाच्या संदर्भातील माहिती पुस्तिका त्यांना भेट देण्यात आली. सनातन संस्था प्रकाशित विविध विषयांवरील ग्रंथ आणि लघुग्रंथही त्यांनी बारकाईने पाहिले.
करणी सेनेचे कार्य संपूर्ण भारतात वाढवण्यासाठीचा प्रयत्न
श्री. लोकेंद्रसिंह कालवी यांनी राजस्थानच्या २२ सहस्र गावांत प्रवास करून ७ लाख युवकांचे संघटन उभे केले आहे. दिग्दर्शक संजय लीला भंसाळी याच्या इतिहासाचे विकृतीकरण करणार्या ‘पद्मावती’ चित्रपटाला करणी सेनेने विरोध केला होता. संघटनेविषयी श्री. कालवी म्हणाले, ‘‘वर्तमानात केवळ राजस्थानपुरताच सीमित असलेले आमचे कार्य संपूर्ण भारतात वाढवण्यासाठी आमचा प्रयत्न असेल.’’
आरक्षणाची समीक्षा होण्यासाठी करणी सेनेचे पुढील आंदोलन !
श्री रजपूत करणी सेनेच्या पुढील आंदोलनाविषयी श्री. कालवी म्हणाले, ‘‘येत्या काळात आरक्षणाची समीक्षा व्हावी, यासाठी आम्ही मोठे जनआंदोलन उभे करणार आहोत. त्या आरक्षणाचा प्रारंभ कसा झाला, कोणासाठी झाला, त्याचा लाभ आता कोणाला होत आहे, कोणाला व्हायला हवा, या सर्वच गोष्टींची समीक्षा व्हावी, अशी आमची मागणी असणार आहे.’’
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात