हैदराबाद महापालिकेच्या निवडणुकीत मुस्लिम मतदारांच्या मनात भीती निर्माण करून वाचाळवीर ओवेसी मतं मागत आहेत. ‘बीफ खायचे असेल तर आम्हाला मते द्या’, असं धमकावत आहेत. पण आगीत तेल ओतून, आगलावी भाषा करून ते मुस्लिमांना नरकातच ढकलत आहेत, अशी सणसणीत चपराक शिवसेनेनं लगावली आहे.
हैदराबाद हा एमआयएमचा बालेकिल्ला आहे. तिथल्या निवडणुकांत ओवेसींनी आरोग्य, शिक्षण, रस्ते, स्वच्छता, दिवाबत्ती याबाबत भूमिका मांडली असती तर एका नेत्याची सुधारणावादी दृष्टी दिसली असती. पण ओवेसी महाशयांनी बीफच्या मुद्द्यावर मतं मागितल्यानं त्यांचं उच्च शिक्षण वाया गेलं असंच म्हणावं लागेल, असा टोलाही ‘सामना’च्या अग्रलेखात हाणलाय.
* हैदराबादचे ओवेसी म्हणजे एक भयंकर प्रकार आहे. हैदराबादेत मुस्लिम मतदार मोठ्या संख्येने असल्यामुळे ओवेसी यांचा एमआयएम पक्ष तेथे नेहमीच वळवळ करीत असतो.
* सध्या हैदराबाद महापालिकेची निवडणूक रंगात आली आहे. त्यात ओवेसी यांनी मुस्लिमांना बजावले आहे की, ‘बीफ खायचे असेल तर आम्हाला मते द्या.’ हैदराबाद महापालिकेची निवडणूक हरल्यास शहरात बीफ खाण्यास व विक्रीवर बंदी घातली जाईल अशी भीती दाखवून ओवेसी मते मागत आहेत.
* ओवेसी यांच्या पायाखालची वाळू सरकत असल्याने, जनाधार घसरत असल्यानेच बहुधा ते अशी वक्तव्ये करू लागले आहेत.
* बीफ म्हणजे गोमांस हा देशातील एक भावनिक तितकाच श्रद्धेचा विषय झाला आहे. बीफवरून अफवा किंवा ठिणगी पडल्यास काय घडू शकते ते दादरी कांडात दिसून आले आहे. त्यामुळे वाचाळवीर ओवेसी यांनी मते मागतानाही ‘गोवंश हत्या करावी’ हा प्रकार आगीत तेल ओतण्यासारखाच आहे.
* खरे तर ओवेसींनी मुस्लिमांना शहाणे करून त्यांना देशाच्या मुख्य प्रवाहात आणायला हवे आणि त्या पद्धतीचे राजकारण करायला हवे. पण इतर मुस्लिम पुढार्यांचीच ‘री’ ओढत ओवेसीदेखील मते मागत आहेत.
* हैदराबादेत आजही सुधारणांना वाव आहे व काही गिचमीड भाग तर बेहरामपाड्याला मागे टाकणारा आहे. असं असताना, ओवेसी बीफच्या मुद्द्यावर मते मागत असतील तर ते कायद्याचे इंग्लंड रिटर्न पदवीधर असूनही त्यांचे उच्च शिक्षण वायाच गेले असे म्हणावे लागेल.
* ओवेसीसारखे शिकलेसवरलेले पुढारीही मुसलमानांना त्याच नरकात ढकलून स्वत:ची राजकीय पोळी भाजत आहेत. आम्ही त्यावर काय बोलायचे?
संदर्भ : महाराष्ट्र टाइम्स