Menu Close

नेपाळचे माजी पंतप्रधान श्री. लोकेंद्र बहाद्दूरचंद यांच्याशी पू. (डॉ.) पिंगळे यांची भेट !

नेपाळचे माजी पंतप्रधान श्री. लोकेंद्र बहाद्दूरचंद आणि अन्य प्रतिष्ठित यांची पू. (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी घेतली भेट !

काठमांडू : हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. (डॉ.) चारुदत्त पिंगळे सध्या नेपाळच्या दौर्‍यावर आहेत. ते विविध मान्यवरांच्या भेटी घेत आहेत. या वेळी त्यांच्यात झालेल्या चर्चेची संक्षिप्त स्वरूपात माहिती देत आहोत.

श्री. लोकेंद्र बहाद्दूरचंद (मध्यभागी) यांना सनातनचे ग्रंथ भेट देतांना पू. (डॉ.) चारुदत्त पिंगळे आणि सर्वांत उजवीकडे श्री. भरत चंद

नेपाळचे माजी पंतप्रधान श्री. लोकेंद्र बहाद्दूरचंद पू. (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांना भेटल्यावर म्हणाले, ‘‘कोणालाही ‘सेक्युलर’चा अर्थ ठाऊक नाही. कोणत्याही देशाच्या संविधानात ‘सेक्युलर’ लिहिलेले नाही. भारतात आणीबाणीच्या काळात मध्यरात्री अचानक देशाला ‘सेक्युलर’ घोषित केले गेले. नेपाळमध्येही असेच झाले आहे. जनतेमध्ये असंतोष आहे. हिंदु धर्म नैतिकता आणि अनैतिकता यांतील अंतर स्पष्ट करून नैतिकतेचे पालन कसे करावे, हे शिकवतो. लोकशाहीत जे मनाला वाटते, तसे करतात; परंतु याचा परिणाम काय होणार आहे ? काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे, हे जाणण्याचा लोकशाहीमध्ये प्रयत्न केला जात नाही.’’

यावर पू. (डॉ.) पिंगळे म्हणाले, ‘‘नेपाळमध्ये खर्‍या अर्थाने लोकशाही नाही. लोकशाही असती, तर ९० टक्के लोकसंख्या हिंदु असूनही नेपाळ ‘हिंदु राष्ट्र’ का बनू शकले नाही ? हे सर्व सिद्धांत पश्‍चिमेकडून आले आहेत, ज्याचे पालन स्वत: तेच करत नाहीत. जे आमचे नाही, ते आम्ही कशाला मान्य करायला पाहिजे ? हिंदूंना आता जागृत व्हायला हवे आणि धर्माचे पालन करायला पाहिजे.’’

या वेळी पू. (डॉ.) पिंगळे यांनी नेपाळचे माजी पंतप्रधान श्री. लोकेंद्र बहाद्दूरचंद यांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले इनके ओजस्वी विचार’ आणि ‘धर्मशिक्षण फलक’ हे सनातनचे हिंदी भाषेतील ग्रंथ भेट दिले.

लिडरशीप अ‍ॅकॅडमी, नेपाळचे संस्थापक श्री. संतोष शहा यांच्याशी पू. (डॉ.) पिंगळे यांची भेट !

श्री. संतोष शहा म्हणाले, ‘‘आजच्या स्थितीला सर्वजण दुसर्‍यांनी काय करावे, हे सांगतात; परंतु स्वत: तसे करत नाहीत. नेपाळ विदेशी राष्ट्रांची युद्धभूमी बनला आहे. येथे काही ना काही घटनाक्रम चालू आहे. आता ‘मधेसका’ विषयाची चर्चा होऊ लागली आहे. नेपाळचे तुकडेतुकडे होऊ लागले आहेत. हे पहाडी (ग्रामीण), हे मधेसी (शहरी) इत्यादी. सर्व नेपाळींमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून फूट पाडली जात आहे.’’

पू. (डॉ.) पिंगळे यावर म्हणाले, ‘‘हे पालटण्यासाठी अनेक मार्ग आहेत. राजनीती विरहीत अशा संघटित शक्तीच्या व्यासपिठाची आवश्यकता आहे. आपण विविध संघटनांशी जोडले जाऊ शकतो, आपले विचार वेगळे असू शकतात; परंतु धर्मासाठी एक होऊन लढले पाहिजे. जे धर्मांतरीत ख्रिस्ती असतात, त्यांच्या पहिल्या पिढीत कट्टरतावादी विचार असतात. ते आपल्या सर्वांसाठी हानीकारक आहे. यासाठी समाजाला जागृत करणे आपले कर्तव्य आहे. वैचारिक स्तरावरही युद्ध करणे आवश्यक आहे.’’

प्रा. गोविंदशरण उपाध्याय यांच्याशी भेट !

पू. (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी प्रा. गोविंदशरण उपाध्याय यांची भेट घेतली. या वेळी बोलतांना प्रा. उपाध्याय म्हणाले, ‘‘विश्‍वातील अनेक भागांत आजही सनातन धर्माचे पुरावे मिळत आहेत. काही ठिकाणी मुसलमानही हिंदु धर्माचे पालन करतात. नेपाळच्या परवत जिल्ह्यात ७३ टक्के लोकसंख्या ब्राह्मण आहे. तेथे जेमिनी ऋषी रहात होते. आज नेपाळमध्ये सर्व प्रकारच्या समस्या आहेत. धर्मांतर, राजकीय अस्थिरता, जाती-पातींमध्ये समाजाची विभागणी, भौगोलिक परीस्थिती इत्यादी.’’

या वेळी पू. (डॉ.) पिंगळे म्हणाले, ‘‘आपल्याला हे समजून घेतले पाहिजे की, पाश्‍चात्त्य देश आपल्याशी कसे वागत आहेत. जेव्हा पाश्‍चात्त्य देशांत एखादी पद्धत जुनी होते, तेव्हा ती पद्धत नेपाळ आणि भारत येथे चालू होते. नवीन भ्रमणभाष संच येतात तेव्हा, त्याची किंमत ३० सहस्र रुपये असते, काही काळाने २०, नंतर १० आणि शेवटी ५ सहस्र रुपये होते. हे समजून घेतले पाहिजे की, प्रथमपासून शेवटच्या किमतीपर्यंत ते किती लाभ करून घेत असतील. पाश्‍चात्त्य देश काय करत आहेत, हे जाणून घेणे आवश्यक आहे.’’

मेधा रुग्णालयाच्या प्रमुखांशी भेट

मेधा रुग्णालयाचे प्रमुख श्री. किशोरजंग राणा यांची पू. (डॉ.) पिंगळे यांनी भेट घेतली. या वेळी श्री. राणा यांनी विचारले की, आजच्या काळात आपण शांती कशी प्राप्त करू शकतो ? शरीर आणि मन एकरूप कसे करू शकतो ? यावर उत्तर देतांना पू. (डॉ.) पिंगळे म्हणाले, ‘‘यासाठी साधना आणि नामजप यांचे महत्त्व समजून घेतले पाहिजे. नामजपामुळे भगवंताच्या सर्व तत्त्वांना आकर्षित करता येते. दैनंदिन जीवनात साधनेचा, अध्यात्माचा सतत अभ्यास केला पाहिजे. समाजाला याचे महत्त्व समजावून सांगितले पाहिजे. आपण स्वत: धागा बनून सर्व हिंदूंना एका माळेत गुंफले पाहिजे.’’

पू. (डॉ.) पिंगळे यांची ‘कांतीपूर एफ्.एम्.’वर घेण्यात आलेली मुलाखत !

वाईटानंतर चांगले येतच असते ! – पू. (डॉ.) चारुदत्त पिंगळे

मुलाखत घेतांना कांतीपूर एफ्.एम्.चे  प्रा. जनार्दन घिमिरे आणि पू. (डॉ.) चारुदत्त पिंगळे

काठमांडू येथील प्रा. जनार्दन घिमिरे यांनी ‘कांतीपूर एफ्.एम्.’वर पू. (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांची मुलाखत घेतली.

प्रा. घिमिरे यांनी प्रारंभी विचारले, ‘‘नेपाळची आजची स्थिती अशी आहे की, जे आपल्या जवळ नाही, त्याच्या मागे सर्वजण धावत आहेत; परंतु जे जवळ आहे, ते घालवत आहेत. अशा अवस्थेत विश्‍वामध्ये अध्यात्माची स्थापना आणि प्रसार कसा होऊ शकतो, हे जाणून घेण्याची इच्छा आहे.’’ यावर उत्तर देतांना पू. (डॉ.) पिंगळे म्हणाले, ‘‘जसे सकाळ झाल्यावर दिवस उजाडतो आणि संध्याकाळ झाल्यावर रात्र होते, या प्रमाणेच सत्त्व, रज आणि तम यांचे चक्र चालू असते. वाईटानंतर (तमोगुणानंतर) चांगले (सत्त्वगुण) येतच असते. ‘ऑक्सफर्ड’च्या शब्दकोषात ‘धर्म’ आणि ‘रिलीजन’ यांची व्याख्या वेगवेगळी केली आहे. ऑक्सफर्डनुसार हिंदु आणि बौद्ध धर्मालाच धर्म मानले आहे. हिंदु हा सहिष्णू आहे. तो शत्रूलाही प्रसंगी सन्मान देतो. आज सर्वत्र सर्वधर्मसमभाव प्रचलित आहे. जर असे आहे, तर बाहेरून नेपाळमध्ये जे येत आहेत, ते चर्च का बनवत आहेत ? मंदिरात का जात नाहीत ? त्यांना केवळ चर्च का बनवायची आहेत ? आपण सर्व हिंदूंनी जागे झाले पाहिजे. भगवान श्रीराम आले, तर श्री हनुमंताप्रमाणे प्रार्थना आणि भक्ती वाढवली पाहिजे आणि रावण आला, तर गदा घेऊन उभे राहिले पाहिजे.’’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *