Menu Close

इतिहासाच्या धड्यांतून मुलांना शिकवले जाणार आहेत शिवकालीन व्यवस्थापन

पुणे : राज्यभरातील शालेय विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यासोबतच त्यांच्या अंगी असणाऱ्या इतर कौशल्यांचीही ओळख व्हावी, म्हणून येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता चौथीच्या इतिहासात महत्त्वाचे बदल केले जाणार आहेत. या माध्यमातून एक उत्कृष्ट व्यवस्थापन गुरू म्हणून छत्रपती शिवरायांची ऐतिहासिक भूमिका राज्यभरातील विद्यार्थ्यांसमोर मांडली जाणार आहे.

राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी पुण्यात ही घोषणा केली. शिवरायांचे हे रूप विद्यार्थ्यांसमोर यावे, यासाठी चौथीच्या इतिहासात आठ पानांचा विशेष भाग नव्याने समाविष्ट केला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या अर्थातच ‘बालभारती’च्या सुवर्णमहोत्सवी वर्षारंभ कार्यक्रमाचे उद‍्घाटन तावडे यांच्या हस्ते ‘बालभारती’मध्ये झाले.

तावडे म्हणाले, ‘शिवरायांच्या शौर्यासोबतच त्यांच्या अंगी असणाऱ्या इतर गुणांचीही माहितीही या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार आहे. तसेच, इयत्ता आठवीच्या इतिहासामध्ये समाविष्ट असणारे ‘१८५७चे बंड’ या पुढे बंड म्हणून न राहता ते स्वातंत्र्यसमर म्हणून शिकवले जाणार आहे. या उठावाला बंड म्हणणे हा त्यात सहभागी असलेल्या सेनानींचा अपमानच ठरतो. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेनेही बदलाच्या सूचना दिल्या आहेत.’

संदर्भ : महाराष्ट्र टाइम्स

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *