नालासोपारा येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन !
नालासोपारा : भारतीय नौसेनेचे निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांना खोट्या आरोपाखाली अटक करून त्यांना देण्यात आलेली फाशीची शिक्षा पाकिस्तानने रहित न केल्यास यापुढे एकाही पाकिस्तानी नागरिकाला भारतात पाय ठेवू देणार नाही, तसेच भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांनाही त्यांच्या देशात हाकलून देण्यात येईल, असे प्रतिपादन हिंदु गोवंश रक्षा समितीचे श्री. दिप्तेश पाटील यांनी केली. येथील पंचमुखी हनुमान मंदिराजवळ राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले.
या वेळी अयोध्येत श्रीराम मंदिराचे बांधकाम लवकरात लवकर आरंभ करण्यात यावे, भारतातील शहरे, गाव, तालुके, पुरातन वास्तू आणि रेल्वेस्थानक यांना देण्यात आलेली विदेशी आक्रमकांची नावे पालटा, अशा मागण्याही करण्यात आल्या.
या आंदोलनात बजरंग दल, योग वेदांत सेवा समिती, श्री बजरंग सेवा दल, शिवसेना, मातृभूमी प्रतिष्ठान, सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
हिंदुत्वनिष्ठांनी व्यक्त केलेले विचार
श्री. प्रशांत वैती, हिंदु जनजागृती समिती : पाकिस्तानी कलाकार आणि खेळाडू यांच्यासाठी गळा काढणारे तथाकथित धर्मनिरपेक्षतावादी आता शांत का बसले आहेत ? पाकिस्तान्यांना पायघड्या घालण्यासाठी आसुसलेले चित्रपटसृष्टीतील शांतीदूत आता जाधव यांच्या फाशीचा निषेध करायला पुढे का येत नाहीत ?
श्री. सूर्यभान सिंग, श्री बजरंग सेवा दल : आपले दुर्भाग्य आहे की, आपण इकडे आरामात दिवस काढत आहोत; मात्र आपले सर्वांचे आराध्यदैवत प्रभु श्रीराम एका लहानशा तंबूमध्ये दिवस कंठत आहेत. जय श्रीराम म्हणतांना प्रत्येक वेळी ही गोष्ट आपल्या लक्षात यायला पाहिजे.
डॉ. सुजित यादव, हिंदुत्वनिष्ठ : आज भारतात अनेक राज्यांत हिंदुत्वनिष्ठ विचारांचे सरकार असूनही भारतातील विविध ठिकाणी असलेली मोगल आणि विदेशी आक्रमकांची नावे अद्याप पालटली गेलेली नाहीत. ही नावे न पालटल्यास आम्ही रस्त्यावर उतरू.
श्री. उमेशचंद्र दुबे, हिंदुत्वनिष्ठ : श्रीराम मंदिराचे काम लवकरात लवकर चालू होण्यासाठी समस्त हिंदूंनी संघटित व्हावे. हिंदूंमध्ये संघटितपणा नसल्यामुळेच प्रभु श्रीराम आज अयोध्येत तंबूमध्ये आहेत. हिंदूंनी श्री रामचरितमानसचा अभ्यास करून कामाला लागावे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात