Menu Close

लाहोर : मुस्लिम मुलीशी मैत्री केली म्हणून ख्रिश्चन तरुणाला चटके !

अंसर मसीह

लाहोर : मुस्लिम मुलीशी मैत्री केल्याच्या कारणावरून एका २१ वर्षीय ख्रिश्चन तरुणाला तप्त रॉडने बेदम मारहाण केल्याची व त्याला चटके दिल्याची घटना पाकिस्तानातील पंजाब प्रांतात घडली आहे. पीडित तरुणाच्या बहिणीने केलेल्या तक्रारीवरून आरोपींना अटक करण्यात आली असली तरी ही तक्रार मागे घेण्यासाठी पीडित तरुणाच्या घरच्यांना धमकावले जात आहे.

अंसर मसीह असे पीडित तरुणाचे नाव आहे. ‘डॉन’च्या वृत्तानुसार गेल्या दोन वर्षांपासून अंसर आणि सदर मुलीची मैत्री होती. दोघेही फोनवरून संपर्कात होते तर अनेकदा अंसर तिला भेटण्यासाठी ती राहत असलेल्या परिसरातही जायचा. मुलीच्या घरच्यांना या मैत्रीबाबत कळताच मुलीचे वडील मंझूर आणि त्याच्या भावांनी अंसरच्या वडिलांना धमकावले. अंसरला वेळीच आवरा. त्याने माझ्या मुलीला पुन्हा भेटण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीच त्यांनी दिली.

दरम्यान, अंसर काही कामानिमित्त शेजारच्या घरी गेला असता मंझूर व त्याच्या भावाने अंसरचे अपहरण केले. त्याला निर्जन स्थळी नेण्यात आले व तिथे निर्वस्त्र करून तापलेल्या लोखंडी रॉडने बेदम मारहाण करण्यात आली. गंभीर बाब म्हणजे मंझूरनेच अंसरला घरी नेऊन सोडले आणि त्याला अपघात झाल्याचे सांगितले. मात्र, अंसरच्या घरच्यांना सगळा प्रकार लक्षात आला आणि त्यांनी तत्काळ शेखूपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. अंसरवर सध्या स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू असून त्याने शुद्धीवर आल्यानंतर सगळा प्रकार पोलिसांना सांगितला आहे.

संदर्भ : महाराष्ट्र टाइम्स

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *