श्री महालक्ष्मी देवस्थान भ्रष्टाचार विरोधी कृती समितीची निवेदनाद्वारे मागणी
कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने सामाजिक कार्यासाठी निधी वापरण्याचा निर्णय रहित करावा, अशा मागणीचे निवेदन १९ एप्रिल या दिवशी ‘श्री महालक्ष्मी देवस्थान व्यवस्थापन भ्रष्टाचारविरोधी कृती समिती’च्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना देण्यात आले. या वेळी संजय शिंदे यांनी ‘हिंदुत्वनिष्ठांच्या भावना शासनापर्यंत कळवण्यात येतील’, असे सांगितले. या वेळी पतित पावन संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री. सुनील पाटील, उपाध्यक्ष श्री. आकाश नवरूखे, श्री शिवप्रतिष्ठानचे शहरप्रमुख श्री. शरद माळी, श्री शिवप्रतिष्ठानचे श्री. श्रीराजीव घोडके, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजी भोकरे, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री मधुकर नाझरे, किरण दुसे, शिवानंद स्वामी आदी हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.
देवस्थान समितीचे सहसचिव शिवाजी साळवी यांनाही श्री महालक्ष्मी देवस्थान भ्रष्टाचार विरोधी कृती समितीच्या वतीने याच मागणीचे निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की,
१. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने वर्ष २०१७-१८ मध्ये अंदाजपत्रकात सामाजिक साहाय्यता निधीसाठी अनुमाने २ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
२. वास्तविक भाविकांनी मंदिरात अर्पण केलेल्या पैशाचा विनियोग हा धार्मिक कार्य करणे, अध्यात्मप्रसार आणि मंदिरांची देखभाल-दुरुस्ती यांसाठीच वापरणे आवश्यक आहेे; मात्र असे न करता भाविकांनी दिलेला निधी सामाजिक कार्यासाठी वापरणे म्हणजे मूळ उद्देशाला हरताळ फासण्यासारखेच आहे.
३. सामाजिक कार्यासाठी शासनस्तरावरून, तसेच अन्य मार्गांनीही निधी प्राप्त होत असतो; मात्र मंदिरांसाठी भाविकांकडून दान म्हणून अर्पण केलेला निधी हा कटाक्षाने धार्मिक कार्यासाठी वापरला गेला पाहिजे.
लाडवाच्या प्रसादाच्या दरात वाढ
कोल्हापूर : हरभर्याच्या डाळीचे दर वाढल्याने येथील करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीदेवीच्या मंदिरात मिळणारा प्रसादाचा लाडू आता ८ रुपयांवरून १० रुपये करण्यात आला आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात