ग्रामस्थांकडून हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांचा सत्कार !
शनिशिंगणापूर चौथर्यावर महिलांनी चढण्याच्या विरोधाचे प्रकरण !
शनिशिंगणापूर : शनिशिंगणापूर येथील परंपरेवर आलेले हे संकट केवळ शनिदेवावरीलच नाही, तर धर्मावरील संकट कसे आहे, याविषयी हिंदु जनजागृती समितीने आम्हाला जागृत केले. समितीने येथे येऊन हिंदु धर्माचा प्रसार केला. अनेक हिंदुत्ववादी संघटना यामध्ये सहभागी झाल्या आणि परंपरेवर आलेले संकट परतवून लावता आले. आमच्या एकाही हिंदु बांधवाला अटक झाली नाही, ही आमची जमेची बाजू आहे. हिंदूंच्या संघटित शक्तीचा हा विजय आहे, शनिशिंगणापूर येथील ग्रामस्थ, भाविक यांच्या वतीने हिंदु जनजागृती समितीचे आभार व्यक्त करतो, असे उद्गार शनिशिंगणापूरचे सरपंच श्री. बाळासाहेब बानकर यांनी काढले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे महराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट, कु. प्रियांका लोणे आणि वैद्य उदय धुरी यांचा सत्कार करण्यात आला.
नगर टाइम्सचे मुख्य वार्ताहर आणि मढी देवस्थानचे विश्वस्त मिलिंद चवंडके यांनी नगर जिल्ह्यात या चळवळीच्या संदर्भात प्रसिद्धीसाठी विशेष सहकार्य केले. त्यांचाही ग्रामस्थ आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या वेळी समितीचे श्री. सुनील घनवट म्हणाले, नास्तिकतावाद्यांना हिंदूंच्या परंपरा तोडण्याचे अधिकार कोणी दिलेले नाहीत. आमच्या परंपरा मोडण्याचे धारिष्ट्य भारतात होते, हेच अत्यंत अयोग्य आहे. अशा प्रकारे धर्माला आव्हान देण्याचा विचारही कोणी करू नये, असे हिंदूंचे संघटन सर्वत्र निर्माण व्हायला हवे. संत, महंत यांनी या आंदोलनाला दिलेला पाठिंबा, सर्व २२ संघटना आणि ग्रामस्थ, पंचक्रोशीतील महिलांमध्ये झालेली जागृती आणि त्यांचे संघटन हे हिंदूंचे मोठे यशच आहे. हिंदू संघटित झाल्यामुळे पोलीस प्रशासनावर दबाव निर्माण झाला.
हिंदूसंघटनामुळे साध्य झालेल्या विजयासाठी धर्माभिमान्यांनी शनिदेवाप्रती व्यक्त केली कृतज्ञता !
या वेळी ममता लॉजचे मालक श्री. माऊली कुर्हाट, गोपीनाथ देठेसर, मिलिंद चवंडके, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट, रणरागिणी शाखेच्या कु. प्रियांका लोणे, हिंदु विधीज्ञ परिषदेचे सदस्य सुरेश कुलकर्णी, यांच्यासह वारकरी संघटना, छावा संघटना, शिव प्रतिष्ठान, शनिशिंगणापूर युवा मंच या संघटनांचे प्रतिनिधी, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतून आलेल्या शनिभक्त आणि धर्माभिमानी महिला, हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते, समस्त शनिशिंगणापूर, सोनई, नेवासा येथील ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
साहाय्य :
१. शनिशिंगणापूर युवा मंचचे सर्वश्री दत्तात्रय जमधडे, सुनील पटाळे, ज्ञानेश्वर जमधडे, ममता लॉजचे माऊली कुर्हाट यांनी धर्माभिमान्यांसाठी दिवसभरासाठी विनामूल्य जागा उपलब्ध करून दिली.
२. श्री. योगेश बानकर यांनी या मोहिमेच्या प्रसिद्धीसाठी पंचक्रोशीतील मोठे होर्डिंग विनामूल्य उपलब्ध करून दिले.
३. दत्ता जमधडे, सुनील पटरे, गोरख भराडे, विजय बानकर, महादेव गाडेकर, सतीश वावरे, साईनाथ बानकर, योगेश तांबे, ज्ञानेश्वर जमधडे या युवकांनी हस्तपत्रकांचे वितरण, भीत्तीपत्रके लावणे, होर्डिंग लावणे असे सर्व प्रकारचे साहाय्य केले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात