कोईम्बतूर (तमिळनाडू) येथे हिंदु मक्कल कत्छीच्या (हिंदु जनता पक्षाच्या) महिला विभागाचा विशेष कार्यक्रम साजरा
कोईम्बतूर (तमिळनाडू) : सध्याचा समाज विविध समस्यांनी ग्रासलेला आहे. हिंदु राष्ट्राची स्थापना हाच या सर्व समर्यांवरील कायमस्वरूपी तोडगा आहे, असे उद्गार हिंदु जनजागृती समितीच्या सौ. सुगंधी जयकुमार यांनी महिलांना मार्गदर्शन करतांना काढले. शहरातील गांधी सलाई येथे १६ एप्रिल या दिवशी हिंदु मक्कल कत्छीच्या (हिंदु जनता पक्षाच्या) महिला विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष कार्यक्रमात त्या बोलत होत्या. सौ. जयकुमार यांनी या वेळी धर्माचरणाचे महत्त्व विषद केले.
कार्यक्रमाचा प्रारंभ दीपप्रज्वलनाने करण्यात आला. या वर्षी चांगली पर्जन्यवृष्टी व्हावी, यासाठी वरूण देवतेला प्रसन्न करण्यासाठी काही भक्तीगीते गाण्यात आली. त्यानंतर निर्मला माताजी यांचे मार्गदर्शन झाले. निर्मला माताजी या महिला विभागाचे नेतृत्व करत आहेत. हिंदु मक्कल कत्छीमध्ये प्रवेश करण्यापूर्वी निर्मला माता वृद्ध आणि अनाथ यांच्यासाठी कार्य करणार्या भारत अण्णााई ईलमच्या प्रमुख होत्या. कृष्णमूर्ती स्वामीजी यांनी त्यांच्या भाषणात महिलांनी सात्त्विक वेश परिधान करण्याचे महत्त्व विषद केले.
आपल्याला मनुष्यजन्म मिळणे आणि तेही हिंदु म्हणून जन्माला येणे हे आपले परमभाग्य आहे, असे या कार्यक्रमातील वक्ते श्री. प्रसन्ना स्वामीगल यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे दुसरे वक्ता श्री. गणपति रवि यांनी सबरीमला मंदिराच्या गर्भागृहामध्ये महिलांच्या प्रवेशाच्या विरोधात तामिळनाडूमध्ये महिलांच्या १ लक्ष स्वाक्षर्या गोळा केल्याचे सांगितले. श्री अय्यप्पा मंदिर व्यवस्थापनाला हे स्वाक्षर्यांचे कागद सुपूर्द करण्यात येणार आहेत. ‘विद्यमान शासनाचे समाजाच्या समस्यांकडे लक्ष नाही’, असे डी.सी. सेन्थील यांनी सांगितले. हिंदु मक्कल कत्छीचे अध्यक्ष श्री. अर्जुन संपथ यांनी त्यांच्या भाषणात वीरमंगाई नचियार, थिलागवातीयार आणि जिजामाता या आदर्श विरांगनांची माहिती सांगितली. पाश्चात्त्य संस्कृतीचा समाजावरील बडगा हटवला पाहिजे. समाजाच्या जडणघडणीत महिलांची भूमिका खूप महत्त्वाची आहे, असे श्री. संपथजी यांनी पुढे सांगितले. हिंदु जनजागृती समितीचे श्री. काशीनाथ शेट्टी या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
क्षणचित्रे
१. कार्यक्रमाला ५०० हून अधिक महिला सहभागी झाल्या होत्या. त्यांनी विषयामध्ये आस्था दाखवली. सर्व महिला कार्यक्रमाच्या अखेरपर्यंत थांबल्या होत्या.
२. निर्मला माताजी यांनी सांगितले की, हा कार्यक्रम वैशिष्ट्यपूर्ण आहे; कारण या कार्यक्रमात महिला उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या आहेत. याच्या उलट राजकीय बैठकांमध्ये लोकांना पैसे देऊन गोळा केले जाते.
३. महिलांनी धर्माविषयी जाणून घेण्यासाठी उत्सुकता दाखवल्याविषयी निर्मला माताजी यांनी आनंद व्यक्त केला.
४. श्री. अर्जुन संपथ यांनी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे हिंदु राष्ट्राविषयीचे विचार मांडले.
५. कृष्णमूर्ती स्वामीजी यांनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचे अभिनंदन केले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात