मराठी भाषिक महाराष्ट्रात शेकडो मराठी शाळा बंद पडत असतांना अमेरिकेत मराठी शाळेला मान्यता मिळते याचा विचार मराठी नागरिक करतील का ?
इलिनॉय : अमेरिकेच्या शिकागो येथील मराठी शाळेला इलिनॉय स्टेट बोर्डाची मान्यता मिळाली आहे. बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या माध्यमातून चालू असलेल्या या शाळेला आता फॉरेन लँग्वेज स्कूलचा दर्जा मिळाला असून १०० हून अधिक मुले या शाळेत मराठीचे धडे गिरवत आहेत. बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या माध्यमातून तब्बल ४० मराठी शाळा चालू आहेत. यांमध्ये ४०० हून अधिक मुले मराठीचे शिक्षण घेत आहेत. या शाळांमध्ये शिकवण्यासाठी अनेक मराठी कुटुंबांनी विनामोबदला शिक्षकी व्यवसाय स्वीकारला आहे. शिकागोच्या या ‘फॉरेन लँग्वेज स्कूल’मध्ये दोन सत्रांमध्ये वर्ग चालवले जात आहेत. मराठी भाषेबरोबरच मुलांना करीअरच्या दृष्टीने आवश्यक अभ्यासक्रमही शिकवला जात आहे.
बृहन्महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष नितीन जोशी यांनी सांगितले, ‘अमेरिकेसारख्या देशात मराठी शाळांना मिळणारा प्रतिसाद खरोखरच कौतुकास्पद आहे. यामुळे प्रतिसादामुळे सातासमुद्रापार मराठी भाषा टिकवण्यासाठी मोठे साहाय्य होणार आहे. आपली मराठी भाषा टिकवणे, संवर्धन करणे हे प्रत्येकाचे दायित्व आहे. याच उद्देशाने हा उपक्रम चालू केला आहे.’
महाराष्ट्र राज्य भाषा सल्लागार समितीचे सदस्य प्रा. अनिल गोरे म्हणाले की, अमेरिकेत विविध भाषांच्या तब्बल ३०० शाळा चालू आहेत. तिथे शाळा चालू करण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करणेही महाराष्ट्राएवढे किचकट नसते. त्यामुळेच शाळेची नोंदणी करणे सोयीचे ठरते. त्यामुळेच हा उपक्रम यशस्वी होत आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात