पुणे : जगात आतापर्यंत ४६ संस्कृतींचा अस्त झाला; पण केवळ हिंदु संस्कृती टिकून राहिली आहे. हिंदु संस्कृती पुन्हा वैभवाच्या शिखराला जाईल. हे सर्व ऋषी आणि संत यांच्या तपःसामर्थ्यामुळे होईल; पण आपण त्यात आपले योगदान दिले पाहिजे, असे प्रतिपादन भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी केले. २६ जानेवारी या दिवशी आकुर्डी येथील आंतरराष्ट्रीय श्रीकृष्ण भावनामृत संघाच्या (इस्कॉनच्या) मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या २५ व्या प्रेरणा समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाचा प्रारंभ दीपप्रज्वलनाने करण्यात आला. ८०० हून अधिक युवक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. इस्कॉनचे श्री. गोविंदप्रभु यांनी प्रास्ताविक केले.
डॉ. स्वामी पुढे म्हणाले…
१. विजिगीषू वृत्तीमुळे गुजरात, महाराष्ट्र आणि राजस्थान या प्रदेशांच्या राजांनी एकत्र येऊन पहिल्या खलिफाचे आक्रमण परतवून लावले. या दणक्यामुळे पुढील ४०० वर्षे ते भारताकडे फिरकले नाहीत. हिंदूंनी आज अशी विजिगिषू वृत्ती ठेवली, तर आपण इसिसला संपवू शकू.
२. गेल्या २०० वर्षांपासून शिक्षणपद्धतीच्या माध्यमातून भारतियांमध्ये हीनत्वाची भावना निर्माण झाली आहे. वास्तविक ७०० वर्षांपूर्वी आपले राष्ट्र सांस्कृतिक, आध्यात्मिक, वैज्ञानिक, शैक्षणिक या सर्व क्षेत्रांत सर्वोत्तम होते. भारतियांना याची जाणीव करून देऊन त्यांच्यामध्ये रुजलेली हीनत्वाची भावना दूर करावी लागेल.
३. हिंदूंनी दुर्बल मनोभूमिका सोडून देऊन कणखर मनोभूमिका अंगीकारली पाहिजे. आपण भारतीय म्हणून ओळख दाखवतो; पण त्याहीपेक्षा आपण हिंदु असल्याची अस्मिता जगाला दाखवली पाहिजे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात