धर्माभिमान्यांची स्तुत्य कृती ! इतर धर्माभिमान्यांनी त्यातून बोध घ्यावा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
देहली : येथे जंतरमंतरवर राष्ट्रीय हिंदू आंदोलनासाठी आलेल्या धर्माभिमान्यांनी आंदोलनस्थळी असलेल्या एका इमारतीच्या भिंतीवरील देवतांच्या फरशा काढण्याविषयी संबंधित घरमालकाचे प्रबोधन केले. त्यानंतर घरमालकाने दोन दिवसांत सर्व फरशा काढण्याचे धर्माभिमान्यांना आश्वासन दिले.
शहरातील जंतरमंतरवर राष्ट्रीय हिंदू आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनस्थळाच्या मागे असलेल्या इमारतीच्या भिंतीवर हिंदूंच्या देवतांची चित्र असलेल्या फरशा लावण्यात आल्याचे धर्माभिमान्यांच्या लक्षात आले. यासंदर्भात बजरंग दलाचे देहली प्रमुख श्री. दीपक सिंह, हिंदु जनजागृती समितीचे श्री. कार्तिक साळुंके, श्री. सुरेश मुंजाल आणि सनातन संस्थेचे श्री. संजीव कुमार यांनी संबंधित घरमालकाची भेट घेऊन त्यांचे प्रबोधन केले. या वेळी घरमालकाने ‘भिंत खराब होऊ नये; म्हणून भिंतीवर फरशा लावल्या’, असे सांगितले. (धर्मशिक्षणाच्या अभावी हिंदूंकडून होणारी चुकीची कृती ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) यावर धर्माभिमान्यांनी भिंत स्वच्छ ठेवण्यासाठी देवतांचा अवमान करणे अयोग्य असल्याची घरमालकाला जाणीव करून दिली आणि या फरशा न काढल्यास पोलीस तक्रार करण्याची चेतावणी दिली. त्यानंतर घरमालकाने दोन दिवसांच्या आत सर्व फरशा काढण्याचे आश्वासन दिले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात