कन्नड लेखक डॉ. के.एस्. भगवान यांची गरळओक
बेंगळुरू (कर्नाटक) : देशात सहस्रो देवस्थाने आहेत. त्यात देव नसल्याचे पुजार्यांनाही माहीत आहे. असे असतांनाही ‘देव आहे’, अशी जनतेमध्ये श्रद्धा निर्माण करून त्यांनी दिलेले धन, सोने-नाणे आणि इतर वस्तू यांच्या रूपात दक्षिणा गोळा करून सर्व पुजारी आळशी झाले आहेत, असा आरोप कन्नड लेखक डॉ. के. एस्. भगवान यांनी केला आहे. येथील ‘एन्जीओ’ सभागृहात दलित संघर्ष समिती (समतावाद) यांच्या वतीने बुसा साहित्य (दुःखी-पीडितांचे साहित्य) चळवळीचे नेते बी. बसलिंगप्पा यांच्या ९३ व्या जन्मदिनोत्सवानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.
डॉ. भगवान म्हणाले, ‘‘भारतावर परकियांची २६ वेळा आक्रमणे झाली. त्यांनी आम्हाला गुलामही बनवले होतेे. तेव्हा देव म्हणवून घेणारे राम, कृष्ण, विष्णु यांच्यासह ३३ कोटी देव प्रजेचे रक्षण न करता कुठे गेले होते ?’’ (या सर्व देवतांनी त्यांची भक्ती करणार्या भक्तांचे वेळोवेळी रक्षण केले आहे, तसेच जेव्हा जेव्हा पृथ्वीवर अधर्म माजला, तेव्हा अवतार धारण करून दुर्जन राक्षसांपासून प्रजेचेही रक्षण केले आहे. त्यासाठी प्रजाही साधना किंवा धर्माचरण करणारी हवी ! याबरोबरच भारतावर झालेली अनेक आक्रमणे मोडून काढणारे राजे ईश्वराचीच भक्ती करत होते, हेही डॉ. भगवान यांनी विसरू नये ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
डॉ. भगवान पुढे म्हणाले, ‘‘शाळा, महाविद्यालयांत शिकवण्यात येणार्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातील ६५ टक्के भाग असत्य आहे. प्रत्येकाने सत्य इतिहास जाणून घेण्यासाठी पुढे आले पाहिजे. याबरोबरच बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी युवकांनी जाणून घेतले पाहिजे. आपण ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळवून मुक्त झालो आहोत, आता ब्राह्मणशाहीतून मुक्त झाले पाहिजे आणि उच्च-नीच ही भावना दूर केली पाहिजे.’’ (ब्राह्मणशाही पूर्वीही नव्हती आणि आताही नाही. त्यामुळे आता ब्राह्मणशाहीतून नाही, तर डॉ. भगवान प्रचार करत असलेल्या पुरोगामीशाहीतून जनतेने मुक्त झाले पाहिजे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात