तुळजापूर येथे हिंदु धर्मजागृती सभा
तुळजापूर : मंदिर सरकारीकरण, तसेच देवालयांच्या तिजोरीतील धर्मदानाची लूट होत आहे. तसेच मंदिरातील नित्योपचारांमध्येही मनमानी करून धर्मपरंपरा पायदळी तुडवल्या जात आहेत. हिंदूंची मंदिरे हिंदूंना शक्ती प्रदान करणारी महत्त्वाची आणि पवित्र केंद्रे आहेत; म्हणूनच हिंदूंनी संघटित होऊन आध्यात्मिक ऊर्जेचे स्रोेत असलेल्या मंदिरांच्या रक्षणासाठी सिद्ध व्हायला हवे. प्रसंगी मंदिर रक्षण करतांना संघटितरित्या आणि सनदशीर मार्गाने लढा देण्यासाठी रस्त्यावर यावे लागल्यासही धर्मशक्ती पणाला लावली पाहिजे, असे आवाहन श्री. मनोज खाडये यांनी केले. येथील लोहिया मंगल कार्यालयामध्ये आयोजित हिंदु धर्मजागृती सभेत ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर हिंदु विधीज्ञ परिषदेचे गोवा राज्य सचिव अधिवक्ता श्री. नागेश ताकभाते उपस्थित होते.
धर्मलढ्यातील न्यायालयीन प्रक्रियेसाठी हिंदु विधीज्ञ परिषद सदैव कटीबद्ध ! – अधिवक्ता नागेश ताकभाते
हिंदु विधीज्ञ परिषदेच्या माध्यमातून दिला जाणारा न्यायालयीन लढा आणि त्यासंदर्भातील यश यांविषयी सविस्तर माहिती देऊन हिंदु राष्ट्र निर्मितीसाठी दिल्या जाणार्या न्यायालयीन लढा देण्यास हिंदु विधीज्ञ परिषद सदैव कटीबद्ध आहे.
सभेच्या प्रारंभी वक्त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. सभेमध्ये श्री. मनोज खाडये आणि अधिवक्ता नागेश ताकभाते यांचा सत्कार शिवराजे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आणि बजरंग दलाचे जिल्हाध्यक्ष श्री. अर्जुन (अप्पा) साळुंके यांच्या हस्ते करण्यात आला. दशावतार मठाचे महंत मावजीनाथ महाराज, सोमवारगिरी मठाचे महंत इच्छागिरी महाराज आणि महंत व्यंकटआरण्य यांचा सत्कार समितीच्या वतीने श्री. दीपक पलंगे यांनी केला.
सभेला भाजपचे गुलचंद व्यवहारे, बाळासाहेब शामराज, शिवसेनेचे शहरप्रमुख श्री. सुधीर कदम, बापूसाहेब नाईकवाडी, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे बाळासाहेब दीक्षित, दशरथ कावरे, बजरंग दलाचे नितीन जट्टे आणि रोहन भांजी, शिवबाराजे प्रतिष्ठानचे विकी वाघमारे, पतंजली योग समितीचे श्री. प्रदीप चव्हाण, शिवप्रतिष्ठानचे श्रीकांत कावरे, आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री. संजय बोंदर, लोहिया मंगल कार्यालयाचे ट्रस्टी श्री. दुर्गादास अमृतराव यांसह २२५ हून अधिक धर्माभिमानी उपस्थित होते.
हिंदु राष्ट्र अभियानाच्या अंतर्गत होणार्या उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी धर्माभिमान्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !
परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राबवल्या जाणार्या हिंदु राष्ट्र अभियानाच्या अंतर्गत हिंदूसंघटन होण्यासाठी विविध उपक्रमांची सविस्तर माहिती श्री. मनोज खाडये यांनी या वेळी दिली. या उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले असता उपस्थित धर्माभिमान्यांनी हात वर करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
सभेनंतर झालेल्या आढावा बैठकीत ‘नवरात्रोत्सवाच्या कालावधीत श्री भवानीदेवी मंदिरात मुख्य प्रवेशद्वारातून भक्तांना प्रवेश मिळावा’, यासाठी ११ मे या दिवशी दशावतार मठामध्ये होणार्या आंदोलनासाठी २४ एप्रिल या दिवशी होणार असलेल्या नियोजन बैठकीत उपस्थित रहाण्याचे आवाहन महंत मावजीनाथ महाराज यांनी केले. तेव्हा उपस्थित ५० हून अधिक युवकांनी बैठकीला उपस्थित राहाणार असल्याचे सांगितले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात