-
कुलभूषण जाधव यांची फाशी रहित करण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ आक्रमक !
-
अंधेरी, मुंबई येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन
अंधेरी (मुंबई) : आम्ही प्रभु श्रीरामाचे मंदिर अयोध्येतच बांधू. यात मुसलमान किंवा कोणत्याही धर्म-पंथ यांच्या बांधवांना आक्षेप असण्याचे कारण नाही. श्रीरामजन्मभूमीवर श्रीराममंदिराचे निर्माण लवकर व्हावे, अशी जगभरातील हिंदू बांधवांची इच्छा आहे. कुलभूषण जाधव यांची फाशी रहित करण्यासाठी आणि श्रीरामजन्मभूमीवर श्रीराम मंदिराचे निर्माण करण्यासाठी सरकारने शर्थीचे प्रयत्न करावेत, अशी मागणी बजरंग दलाचे श्री. ब्रिजेश शुक्ल यांनी केली. २२ एप्रिलला अंधेरी (पू.) येथे झालेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात ते बोलत होते.
बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जैन सेवा संघ, मी मराठी संघ, जय जवान मित्र मंडळ, आेंकारेश्वर चॅरिटेबल ट्रस्ट, हिंदु गोवंश रक्षा समिती, सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती या संघटनांचे, तसेच शिवसेना आणि भाजप या पक्षांचे कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.
भारतीय नौसेनेचे निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने खोट्या आरोपाखाली अटक करून दिलेली फाशीची शिक्षा रहित करून भारत शासनाने त्यांना तात्काळ देशात परत आणावे, श्रीरामजन्मभूमीवर भव्य श्रीराम मंदिराचे निर्माण करण्यास आरंभ करावा आणि श्रीरामजन्मभूमीवर श्रीरामाची विधीवत पूजा करण्यास हिंदूंना कायमस्वरूपी अनुमती मिळावी, आक्रमकांची नावे असलेली शहरे, गावे, रेल्वे स्थानके, मार्ग, पुरातन वास्तू यांची नावे पालटावीत, या मागण्याही आंदोलनात करण्यात आल्या.
अन्य मान्यवरांचे विचार
भारताने शत्रूराष्ट्रांच्या विरोधात आपली शक्ती वापरण्याची योग्य वेळ आली आहे ! – श्री. द्विवेंद्र दुबे, राष्ट्रप्रेमी नागरिक
छोटासा इस्रायल देश त्याच्या नागरिकांचे अपहरण अथवा हत्या केल्यास शत्रूराष्ट्राला धडा शिकवतो. इस्रायल, अमेरिका यांप्रमाणे भारतही शक्तीशाली देश आहे; मात्र भारतात शत्रूराष्ट्रांना पाठिंबा देणारे काही नेते, अधिवक्ते असल्यामुळे अडचणी येत आहेत. भारताने आपली शक्ती शत्रूराष्ट्रांच्या विरोधात वापरण्याची हीच योग्य वेळ आहे.
आपल्याला सीमेवर जाऊन शत्रूराष्ट्राच्या विरोधात लढणे शक्य नाही, तर किमान कुलभूषण जाधव यांची फाशी रोखण्यासाठी विविध संघटना करत असलेल्या प्रयत्नांना तरी पाठिंबा द्या ! – हर्षल धराधर, जय जवान मित्र मंडळ
या देशात पकडले जाणारे आतंकवादी हे पाकिस्तानचे आणि मुसलमान देशांतील आतंकवादी संघटनांचे असतात, त्यांच्यावर कठोर कारवाई का होत नाही ? पंतप्रधानांनी लवकरात लवकर कुलभूषण जाधव यांना भारतात आणावे. – श्री. संदीप सिंग, जैन सेवा संघ
शासनाने असे नामकरण होण्यासाठी प्रयत्न करावेत !
ज्या औरंगजेबाने ४० दिवस छत्रपती संभाजी महाराजांवर अत्याचार केले, त्या देशद्रोह्याचे नाव राज्यातील एका मोठ्या शहराला आहे. ‘औरंगाबाद’ हे नाव पालटून त्वरित ‘संभाजीनगर’ हे नाव व्हायला हवे. ‘दिल्ली’चे ‘इंद्रप्रस्थ’, ‘अहमदाबाद’चे ‘कर्णावती’, ‘इलाहाबाद’चे ‘प्रयाग’, ‘ताजमहल’चे ‘तेजोमहालय’, ‘कुतुबमिनार’चे ‘विष्णुस्तंभ’ असे नामकरण होणे आवश्यक आहे, अशी मागणी या वेळी करण्यात आली.
क्षणचित्रे
१. बजरंग दलाचे श्री. ब्रिजेश शुक्ल यांचा पुतण्या कु. निमेष संतोष शुक्ल (वय ५ वर्षे) आंदोलनात अखेरपर्यंत सहभागी झाला होता. त्याने ध्वनीक्षेपकावरून उत्स्फूर्तपणे घोषणाही दिल्या.
२. स्वाक्षरी मोहिमेत अनेक राष्ट्रप्रेमी नागरिकांनी स्वत:हून सहभाग घेतला आणि आंदोलनातही सहभागी झाले.
३. आंदोलन संपल्यावर सहभागी राष्ट्रप्रेमी नागरिकांनी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रतिनिधींची भेट घेऊन राष्ट्र आणि धर्म कार्यात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली.
४. स्थानिक पोलिसांचे आंदोलनाला सहकार्य लाभले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात