धाराशिव : समाजाचा एक घटक म्हणून अधिवक्ता यांनी सामाजिक समस्या सोडवण्यात आपले बहुमोल योगदान द्यायला हवे, तरच राष्ट्रोत्थान, तसेच राष्ट्ररक्षण यांमध्ये आमूलाग्र साहाय्य होईल, असे प्रतिपादन पश्चिम महाराष्ट्र समिती समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी केले. २० एप्रिल या दिवशी येथील अधिवक्त्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
श्री. खाडये पुढे म्हणाले, ‘‘प्रत्येक कार्यालयात भ्रष्टाचार हा शिष्टाचार झाला आहे. कोट्यवधी रुपये कमावणारे खेळाडू मानधन वाढवून मागत आहेत; तर डोळ्यांत तेल घालून १२५ कोटी जनतेचे रक्षण करणार्या सैनिकाला किमान सकस आहारासाठी शासनाकडे मागणी करावी लागते. पहाटेच्या वाजणार्या भोंग्यांमुळे आजारी, वृद्ध, विद्यार्थी यांना त्रास होत आहे. पोलिसांना न्यायालयाचा आदेश असूनही त्याची अंमलबजावणी होतांना दिसत नाही. वैद्यकीय क्षेत्रात प्रचंड लूट होत आहे. या सर्व समस्यांवर अधिवक्ता या नात्याने आपले योगदान दिल्यास सामाजिक क्रांती निश्चित होऊ शकते.’’
या वेळी उपस्थित अधिवक्त्यांना सध्याच्या राष्ट्र आणि धर्म यांच्या गंभीर स्थितीविषयी अवगत केले. या मार्गदर्शनाला येथील २५ अधिवक्ते उपस्थित होते. प्रारंभी अधिवक्ता श्री. नागेश ताकभाते यांनी प्रस्तावना केली, तर येथील बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अधिवक्ता श्री. वसंत वडने यांनी आभार प्रदर्शन केले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात