हिंदूंचा अवमान करणार्याचा संघटितपणे विरोध करणार्या मलेशियातील हिंदु संघटनांचे अभिनंदन ! धर्मासाठी मलेशियातील हिंदु संघटना एकत्र येऊ शकतात, तर भारतातील का नाही ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
कुआलालंपूर (मलेशिया) : पेरलिस मुफ्ती डॉ. महंमद असरी यांनी त्यांच्या कवितेतून हिंदु समुदायाचा अवमान केल्याच्या प्रकरणी मलेशियातील सुमारे ४० हिंदु संघटनांनी त्यांच्या विरोधात सेन्तुल पोलीस मुख्यालयात तक्रार केली आहे. डॉ. असरी उपाख्य डॉ. मझा यांनी हिंदूंच्या विरोधात द्वेषपूर्ण विधाने केल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. डॉ. महंमद असरी यांनी फेसबूकवर ही कविता प्रसिद्ध केली आहे.
१. ‘मुफ्ती’ हे इस्लामची शिकवण देणारे राज्यातील सर्वोच्च पद आहे. अशा उच्चपदावरील व्यक्तीने इतर धर्मांचा अवमान करणे योग्य नाही, असे हिंदु संघटनांचे प्रवक्ता श्री. राजा रेतिनाम यांनी म्हटले आहे. मुफ्तीच्या विरोधात देशाच्या विविध भागांत तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत, असे श्री. रेतिनाम यांनी सांगितले.
२. मलेशियातील हिंदु संघटनेचे नेते श्री. शिवराज चंद्रन् यांनी म्हटले आहे की, हिंदूंच्या पूजाविधीवर टीका करणार्या इस्लामच्या धर्मगुरूंनी जाहीर क्षमायाचना करावी. धर्माची शिकवण देणार्या या धर्मगुरूंनी इतर धर्मांवर टीका करून द्वेष पसरवणे लज्जास्पद आहे. हिंदु समुदायाच्या विरोधात केलेले विधान त्यांनी मागे घ्यावे.
३. भारत आणि मलेशिया यांच्यातील संबंध चांगले राखायचे असल्यास डॉ. झाकीर नाईक यांना मलेशियामध्ये देण्यात आलेला कायमस्वरूपी वास्तव्याचा दर्जा मागे घेण्यात यावा, अशी मागणी ‘मलेशियन अॅसोसिएटेड इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्री’ने केली आहे.
४. डॉ. झाकीर नाईक यांनी भारत आणि मलेशिया यांच्यातील चांगले संबंध बिघडवू नये, असे मलेशियन शासनालाही वाटत आहे, असे या संस्थेचे अध्यक्ष तानश्री केन्नेथ ईश्वरन् यांनी म्हटले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात