सातारा येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन
सातारा : अयोध्येतील श्रीराममंदिर हे हिंदूंचे आहे आणि ते हिंदूंचेच रहाणार आहे. हिंदूंनी संघटित होऊन राममंदिर उभारले पाहिजे, असे उद्गार पू. कुंभार महाराज यांनी काढले. येथे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात ते बोलत होते. श्रीराममंदिर बनवण्याची समयमर्यादा निश्चित करणे, हिंदूंना तेथे नित्य पूजा करण्याची अनुमती देणे, घुसखोर रोहिंग्या मुसलमानांना देशातून हाकलून द्यावे, बोधनस्थित इंद्र नारायण वैष्णव मंदिराचे रूपांतर देवल मशीद अर्थात तेलंगणाची बाबरी असे केले असून त्याचे पुन्हा मंदिरात रूपांतर करणे, पाकिस्तानने श्री. कुलभूषण जाधव यांना ठोठावलेल्या फाशीला विरोध करणे या मागण्यांसाठी येथे हिंदु जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. यात रणरागिणींचा सहभाग लक्षणीय होता.
समितीचे श्री. हनुमंत कदम यांनी आंदोलनाचा विषय स्पष्ट केला. आंदोलनात रणरागिणी शाखेच्या सौ. विद्या कदम, सौ. रूपा महाडिक, सौ. गीतांजली गोंधळेकर आणि समितीचे श्री. महेंद्र निकम यांनीही मार्गदर्शन केले.
मान्यवरांचे विचार
भारताने इस्राईल किंवा अमेरिका या देशांचा आदर्श घ्यावा ! – शिवराज तलवार
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे श्री. शिवराज तलवार म्हणाले, ‘‘श्री. कुलभूषण जाधव यांना मायदेशी परत आणण्यासाठी देशभर आंदोलन उभी करा. कुलभूषण जर इस्राईल किंका अमेरिकेचे नागरिक असते, तर आतापर्यंत त्या देशांनी पाकिस्तान कधीच बेचिराख करून कुलभूषण जाधवांना मायदेशी आणले असते ! वेळ आली, तर पाकिस्तानवर आक्रमणही करावे.’’
पाकिस्तानला नामशेष करायला हवे ! – अधिवक्ता गोविंद गांधी
अखिल हिंदू महासभेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आणि अधिवक्ता श्री. गोविंद गांधी म्हणाले, ‘‘अयोध्या, काशी, मथुरा येथील मशिदींच्या ठिकाणी मंदिर उभारावे. अखंड हिंदु राष्ट्र झाले पाहिजे. पाकिस्तानला नामशेष करायला हवे.’’
क्षणचित्रे
१. आंदोलन चालू असतांना तेथे साध्या वेषातील पोलीस उपस्थित होते.
२. आंदोलनात सहभागी झालेले सातारा येथील बाळासाहेब म्हणून ओळखले जाणारे श्री. भगवानराव शेवडे हे उपस्थितांचे लक्ष्य वेधून घेत होते.
३. आंदोलनाच्या वेळी पुष्कळ लोक जमले होते.
४. आंदोलन फेसबूकच्या माध्यमातून २०० हून अधिक लोकांनी पाहिले.
मागण्यांच्या पूर्ततेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन !
वरील मागण्यांच्या अनुषंगाने येथील जिल्हाधिकारी कार्यालयात श्री. कुंभार यांना निवेदन देण्यात आले. या वेळी समितीचे श्री. हेमंत सोनावणे, विश्व हिंदू परिषदेचे शहर मंत्री श्री. जितेंद्र वाडकर, रणरागिणी शाखेच्या सौ. रूपा महाडिक आणि सौ. नीला निंबाळकर उपस्थित होत्या.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात