नवी देहली : अयोध्येतला राम मंदिर आणि बाबरी मशिदीचा वाद सुप्रीम कोर्टामध्ये आहे. पण १९७६-७७ मध्ये या वादग्रस्त जागेवर झालेल्या खोदकामादरम्यान हिंदू मंदिर असल्याचे अवशेष मिळाले होते. असा दावा प्रसिद्ध पुरातत्व जाणकार के.के. मोहम्मद यांनी केला आहे.
हे खोदकाम जेव्हा झाले तेव्हा आपणही त्या संघामध्ये असल्याचे मोहम्मद म्हणाले आहेत. मोहम्मद यांनी आपले आत्मचरित्र ‘जानएन्ना भारतीयन'(मी पण एक भारतीय) मध्ये हा दावा केला आहे. मोहम्मद हे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग उत्तर प्रदेशचे निर्देशकही होते.
मोहम्मद यांनी दावा केला आहे, की त्या वादग्रस्त जागेवर खोदकाम करताना आम्हाला १४ स्तंभ मिळाले, हे स्तंभ ११ व्या आणि १२ व्या शतकातील मंदिरांच्या बांधकामासारखे होते. या खोदकामामुळे हे सिद्ध झाले की मंदिराच्या जागी मशिद उभारण्यात आली. या सगळ्या प्रकाराबाबत आपण इंग्रजी वृत्तपत्रांनाही माहिती दिली पण कोणीच त्याला महत्त्व दिले नसल्याचेही मोहम्मद म्हणालेत.
अयोध्येच्या मुद्द्यावरुन डाव्या संघटना आणि काही इतिहासकारांनी दिशाभूल केली नसती तर हा प्रश्न कधीच सुटला असता असा आरोपही मोहम्मद यांनी केला आहे. इतिहास अनुसंधान परिषदेचे तत्कालीन सदस्य प्रोफेसर इरफान हबिब, रोमिला थापर, बिपीन चंद्रा, एस गोपाल यांच्यासारख्या डावे विचार असणाऱ्या इतिहासकारांनी मुसलमान विचारवंतांचे ब्रेन वॉश केले आणि त्यांनी सगळ्यांनी मिळून अलाहाबाद उच्च न्यायालयाचीही दिशाभूल केल्याचे मोहम्मद म्हणाले आहेत.
१९ व्या शतकाआधी मंदिरामध्ये तोडफोड झाल्याचे आणि तिथे बौद्ध किंवा जैन धर्माचे केंद्र असल्याचे कोणतेही दाखले नाहीत, हे मुसलमानांना सांगण्यात सगळे डावे विचारवंत यशस्वी झाले, असेही मोहम्मद म्हणालेत. डावे इतिहासकार आरएस शर्मा, डीएन झा, सूरज बेन आणि अख्तर अली यांनीही त्याचे समर्थन केले. या सगळ्यांनी काही मुसलमान नेत्यांना घेऊन अयोध्येचा मुद्दा शांततापूर्ण मार्गाने सोडवून दिला नाही, असा दावा मोहम्मद यांनी केला आहे.
स्त्रोत : जी न्यूज