आरक्षणाचे दुष्परिणाम
नाशिक : ब्राम्हण समाजातील मुले परदेशात शिक्षणासाठी जाण्याचे आणि तेथेच स्थायिक होण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. याला कारणीभूत देशातील आरक्षणाची स्थिती आहे. या कुशाग्र बुद्धीमत्तेला मायदेशी परत आणण्याची तसेच त्यांच्या गुणवत्तेला वाव देण्याची गरज असून त्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असे प्रतिपादन पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी शुक्रवारी नाशिकमध्ये केले.
चित्तपावन ब्राम्हण संघाच्या वतीने आयोजित श्री परशुराम वेद पुरस्कार सोहळ्यात त्या बोलत होत्या. यावेळी महापौर रंजना भानसी, संघाचे अध्यक्ष विजय साने, अभय खरे, श्रीरंग वैशंपायन, माजी उपमहापौर सतीश कुलकर्णी, नगरसेविका दीपाली कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. गोळे कॉलनीतील काका गद्रे मंगल कार्यालयात हा कार्यक्रम झाला. वेदमुर्ती महेश सोवनी (ऋग्वेद), शैलेंद्र काकडे (यजुर्वेद), सचिन कुलकर्णी (अथर्ववेद), श्रीधर अघोर (सामवेद) यांना श्री परशुराम वेद पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सात हजार रुपयांचा धनादेश, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. पुर्वी हा पुरस्कार पाच हजार रूपयांचा होता. त्यामध्ये दोन हजार रूपयांनी वाढ करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली. विजय साने यांनी प्रास्ताविक केले. चार वेदांचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना संघाच्या वतीने शिष्यवृत्ती सुरू करण्याचा मानस साने यांनी व्यक्त केला.
यावेळी मुक्ता टिळक म्हणाल्या, ‘ब्राम्हण समाज वेगवेगळ्या शाखांमध्ये विखुरला आहे. या समाजाने एक होणे ही काळाची गरज आहे. अंतर्गत भेद बाजूला ठेऊन सर्वांनी एकत्रित यावे तसेच रोटी बेटी व्यवहार सुरू करावेत असे आवाहन यावेळी करण्यात आले. प्रारंभी भगवान परशुरामांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विनायक साने व सहकाऱ्यांनी मंत्र पठण केले. पाहुण्यांचा परिचय अभय खरे यांनी करून दिला. मैथिली गोखले यांनी सूत्रसंचालन केले तर आभार श्रीरंग वैशंपायन यांनी मानले.
संदर्भ : महाराष्ट्र टाइम्स