राज्यात उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
मुंबई : गरीब आणि दुर्बल घटकांना रुग्णालयांत विनामूल्य उपचार मिळावेत, या उद्देशाने शासनाकडून सवलत घेणार्या धर्मादाय रुग्णालयांना नियमाप्रमाणे ठराविक प्रमाणात दारिद्य्ररेषेखालील रुग्णांना निःशुल्क वा सवलतीच्या दरात उपचार देणे, खाटा उपलब्ध करणे या गोष्टी बंधनकारक आहेत. असे असतांना त्याचे पालन होत नाही. या अनुषंगाने हिंदु जनजागृती समिती आणि इतर संघटना यांच्या वतीने ठिकठिकाणी धर्मादाय आयुक्तांना निवेदने देण्यात आली.
नगर येथे ४ रुग्णालयांच्या विरोधात साहाय्यक धर्मादाय आयुक्तांना निवेदन
नगर : येथील सेंट लुक्स हॉस्पिटल, स्वामी विवेकानंद हॉस्पिटल, आनंदऋषीजी हॉस्पिटल, काकासाहेब म्हस्के कामगार हॉस्पिटल या ४ रुग्णालयांनी दर्शनी भागात सूचनाफलक लावलेले नाहीत. त्या विरोधात येथील साहाय्य्यक धर्मादाय आयुक्त बी.पी. येंगडे यांच्याकडे निवेदनपर तक्रार करण्यात आली. या वेळी त्यांनी सांगितले की, आम्ही प्रत्येक मासाला रुग्णालयाला भेट देतो. त्या वेळी याची चौकशी करून त्यात लक्ष घालू.
रत्नागिरी येथे धर्मादाय रुग्णालयांमध्ये दर्शनी भागात फलक लावण्याचे धर्मादाय आयुक्तांचे आदेश
आदेशाचे पालन न करणार्यांवर कारवाई करणार
रत्नागिरी : धर्मादाय रुग्णालयांनी शासकीय योजनांची योग्य प्रकारे कार्यवाही करावी, यासाठी रत्नागिरी विभागाचे साहाय्यक धर्मादाय आयुक्त श्री. अ.प्र. कुलकर्णी यांना हिंदुत्वनिष्ठांच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावर साहाय्यक धर्मादाय आयुक्त श्री. कुलकर्णी यांनी निवेदनाची दखल घेत सार्वजनिक न्यासाच्या रुग्णालयांमध्ये रुग्णांसाठी असलेल्या शासकीय योजनेची उचित प्रसिद्धी करणारे फलक रुग्णालयांच्या दर्शनी भागात लावण्याच्या आदेशाची कार्यवाही रुग्णालयांनी केली आहे का ? आणि तसे केले नसल्यास त्यांना तसे फलक तातडीने लावण्याचे आदेश द्यावेत, अशा सूचना संबंधित अधिकार्यांना दालनात बोलावून दिल्या. ‘जी रुग्णालये या आदेशाचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल’, असेही श्री. कुलकर्णी यांनी सांगितले.
या वेळी पतंजलि योग समितीचे अधिवक्ता श्री. विद्यानंद जोग, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, रत्नागिरीचे श्री. अभिजित गिरकर, श्री. नीलेश नेने, सनातन संस्थेचे डॉ. संतोष नाणोसकर आणि श्री. सुबोध मोंडकर अन् हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक श्री. संजय जोशी उपस्थित होते.
निवेदन देतांना पतंजलि योग समितीचे अधिवक्ता श्री. विद्यानंद जोग म्हणाले, ‘‘मुंबई उच्च न्यायालयाच्या जनहित याचिका क्र. ३१३२/२००४ च्या आदेशानुसार समाजातील दारिद्य्ररेषेखालील घटकांना राज्याच्या सार्वजनिक न्यासाद्वारे चालवल्या जाणार्या रुग्णालयांत १० टक्के खाटांचे आरक्षण आणि विनामूल्य उपचार तसेच दुर्बल घटकांसाठीही १० टक्के खाटांचे आरक्षण आणि सवलतीच्या दरात उपचार असणे आणि तसे फलक रुग्णालयांच्या दर्शनी भागात लावणे बंधनकारक आहे. रत्नागिरी जिल्ह्यात अशा काही रुग्णालयांत आम्हाला फलक दिसून आले नाहीत. यात रत्नागिरीतील दिवालीबेन मोहनलाल मेहता लायन्स आय हॉस्पीटलचा समावेश आहे. या रुग्णालयांमध्ये न्यायालयाच्या आदेशाची कार्यवाही तातडीने करण्यात यावी, जेणेकरून गोरगरीब जनतेला शासनाच्या योजनांचा लाभ घेता येईल.’’
पुण्यात श्रीविष्णूचे आशीर्वाद घेऊन सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या निर्मूलनातील लढ्याला आरंभ !
पुणे : अक्षय्य तृतीयेला सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील मोहिमेला आरंभ करण्यापूर्वी हिंदु जनजागृती समितीचे ६५ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. कृष्णाजी पाटील यांनी शनिवार पेठेतील श्रीविष्णूच्या मंदिरात जाऊन देवाला प्रार्थना केली आणि श्रीफळ, पुष्पहार अर्पण केला. ‘मोहिमेत येणारे सर्व अडथळे दूर होऊन मोहीम निर्विघ्नपणे पार पडू दे, तसेच अधिकाधिक धर्माभिमानी मोहिमेत जोडले जाऊ देत’, अशी प्रार्थना करून श्री. पाटील यांनी साष्टांग नमस्कार केला. त्यानंतर ‘मूर्तीतून प्रत्यक्ष श्रीविष्णु आशीर्वाद देत आहेत’, असे श्री. पाटीलकाकांना जाणवले. निवेदन देण्यासाठी जात असतांना श्री. केतन पाटील यांच्या अंगावर पिंपळाचे एक पान उडून आले. पिंपळाचे झाड शुभ मानले जाते. अशा घटनांमधून प्रत्यक्ष भगवंतानेच तो समवेत असल्याची, तसेच मोहीम निर्विघ्नपणे पार पडणार असल्याची साक्ष दिली !
ठाणे येथे निवेदन सादर
येथेही साहाय्यक धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार देतांना शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, हिंदु महासभा, वारकरी संप्रदाय, भाजप, हिंदु जनजागृती समिती या संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात