२४ हजार मदरशांना आर्थिक रसद
वॉशिंग्टन : पाकिस्तानातील दहशतवाद पोसण्यामध्ये सौदी अरेबियाचा मोठा वाटा असून तब्बल २४ हजारांपेक्षा अधिक मदशांना आर्थिक रसद मिळत असल्याचा खळबळजनक दावा अमेरिकन सिनेटर क्रिस मर्फी यांनी केला आहे. या मदरशांतील शिकवणुकीतून दहशतवादीच तयार होत असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. तसेच सौदी अरेबियाने १९६० पासून आतापर्यंत मुस्लिम कट्टरतावादाचा प्रसार करण्यासाठी १०० अब्ज डॉलरपेक्षा अधिक मदतनिधी जगभरातील मदरशे आणि मशिदींना दिला आहे. या तुलनेत रशियाने साम्यवादी विचारांचा प्रसार करण्यासाठी १९२० ते १९९१ या कालखंडात सात अब्ज डॉलर खर्च केले होते. यामुळे अमेरिकेने सौदी अरेबियाच्या कट्टरपंथाला असलेल्या मूकसंमतीवर विचार करण्याची गरज असल्याचेही क्रिस मर्फी यांनी सांगितले. ‘अमेरिकन थिंक टँक कौन्सिल ऑन फॉरेन रिलेशन’मध्ये ते बोलत होते.
क्रिस मर्फी यांचे खडे बोल
सौदी अरेबिया मुस्लिम कट्टरतावादी विचारांचा प्रसार करणार्या जगभरातील मदरशे आणि मशिदींना आर्थिक पुरवठा करतो. त्याकडे अमेरिका दुर्लक्ष करत असून हे धोक्याचे आहे. सौदी अरेबियाच्या येमेनमधील सैन्य कारवाईला जोपर्यंत ‘इसिस’ आणि ‘अल कायदा’विरोधात हा लढा सुरू असल्याचे स्पष्ट होत नाही तोपर्यंत अमेरिकेने समर्थन देणे बंद केले पाहिजे. सौदी अरबमधील सत्ताधारी शाही परिवार आणि कट्टरपंथीय वहाबी मौलवी यांच्यातील संबंध जुने आहेत. त्यामुळे वहाबी आंदोलनासाठी शाही परिवारांकडून आर्थिक पुरवठा केला जातो.
संदर्भ : सामना