जोधपूर उच्च न्यायालयातील अधिवक्त्यांसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मार्गदर्शन !
जोधपूर : आज धकाधकीच्या जीवनात शाळकरी मुलापासून ते विविध क्षेत्रांत कार्यरत प्रत्येकाला तणाव आहे. तणाव दूर होण्यासाठी शारीरिक आणि मानसिक स्तरावरील प्रयत्नांच्या जोडीला शास्त्रानुसार योग्य साधनाही महत्त्वाची आहे. संपूर्ण तणावमुक्तीचे औषध विज्ञानाकडे नव्हे, तर अध्यात्माकडे आहे. त्यामुळे आनंदी जीवनासाठी अध्यात्म जीवनात आणण्याला पर्याय नाही, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राजस्थान समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी केले. ते येथील ‘राजस्थान हायकोर्ट अॅड्वोकेटस् असोसिएशन, जोधपूर’च्या वतीने आयोजित ‘तणावमुक्तीसाठी अध्यात्म’ या विषयावर बोलत होते.
या वेळी व्यासपिठावर सनातन संस्थेच्या संत पू. सुशीला मोदी, असोसिएशनचे अध्यक्ष अधिवक्ता श्री. रणजित जोशी, कोषाध्यक्ष अधिवक्ता श्री. पुखराज जैन, पुस्तकालय सचिव अधिवक्ता कु. सुशीला शर्मा, सनातन संस्थेच्या साधिका डॉ. (सौ.) स्वाती मोदी आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन असोसिएशनचे महासचिव अधिवक्ता श्री. करुणानिधी व्यास यांनी केले.
श्री. जाखोटिया पुढे म्हणाले, ‘‘स्वातंत्र्याच्या ६९ वर्षांनंतर आजही नागरिकांना रस्ते, वीज, पाणी, वाहतूक यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. प्रत्येक ठिकाणी त्याची फसवणूक होत आहे. दुर्दैवाने भारतात कायदा आणि संविधान शिकवले जात नसल्याने सामान्य व्यक्ती अन्यायाचा प्रतिकार करण्याचा आत्मविश्वास हरवून बसली आहे. अशा स्थितीत अधिवक्त्यांनी समाजाला विविध कार्यशाळा घेऊन प्रशिक्षित केले, तर नक्कीच समाजातील तणाव दूर करण्यासाठी ते साहाय्य करू शकतात. हिंदु धर्मामध्ये कर्मफल सिद्धांत सांगितला आहे. त्यामुळे सत्याचा पक्ष ठेवणारे खटलेच अधिवक्त्यांनी लढवले, तर तणावापासून दूर रहातील आणि त्यांची त्यात साधनाही होईल.’’
या वेळी डॉ. (सौ.) स्वाती मोदी यांनी उपस्थितांना शास्त्रानुसार कुलदेवता आणि दत्त यांचा नामजप कसा करावा, याची विस्ताराने माहिती दिली.
क्षणचित्रे
- कार्यक्रमाच्या ठिकाणी सनातनचे विविध विषयांवरील ग्रंथांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.
- कार्यक्रमानंतर अधिवक्त्यांनी काही प्रश्न विचारून त्यांच्या शंकांचे निरसन करून घेतले.
- या वेळी बार असोसिएशनच्या वतीने प्रतीकचिन्ह देऊन हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचा सन्मान करण्यात आला.
समाजाचा ताण घालवतो, तो अधिवक्ता ! – अधिवक्ता रणजित जोशी
असोसिएशनचे अध्यक्ष श्री. रणजित जोशी म्हणाले, ‘‘आम्ही आमच्याकडे येणार्या व्यक्तीचा ताण आमच्यावर घेतो आणि त्याला निश्चिंत करून घरी पाठवतो. लोकांनी आपल्या वाणीवर संयम ठेवला, तरी तणावाचे अनेक प्रसंग अल्प होऊ शकतात.’’
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात