रामवाडी, जोगेश्वरी येथील व्याख्यानात ३० धर्माभिमानी उपस्थित
मुंबई : ‘प्रत्येक हिंदूने साधना करून आपल्या पाल्यांवर साधनेचे संस्कार केले पाहिजेत. त्यांच्यामध्ये हिंदु धर्माप्रती श्रद्धा निर्माण करून त्यांच्याकडून धर्माचरण करवून घेतले पाहिजे. अनेक हिंदु कुटुंबे जेव्हा साधना आणि धर्माचरण करू लागतील, तेव्हा ईश्वराच्या कृपेने हिंदूंचे अभेद्य संघटन उभे राहील, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुमित सागवेकर यांनी जोगेश्वरी येथील रामवाडी परिसरात झालेल्या व्याख्यानाच्या वेळी केले. येथील त्रिवेणी संगम स्पोर्ट्स क्लबच्या वतीने हिंदु राष्ट्र जागृतीपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. रामवाडी येथील प्रखर धर्माभिआणि त्रिमानी वेणी संगम स्पोर्ट्स क्लबचे खजिनदार श्री. संदेश धुरी यांनी व्याख्यानाचे आयोजन करण्यासाठी स्वत:हून पुढाकार घेतला. व्याख्यानाच्या आधी श्री. धुरी यांनी स्थानिक श्री गणपति मंदिरात श्रींच्या पुढे विडा ठेवून हिंदु राष्ट्र जागृतीपर व्याख्यानाच्या यशस्वीतेसाठी साकडे घातले. रामवाडी परिसरातील ३० धर्माभिमानी व्याख्यानाला उपस्थित होते. अनेक महिलांनीही व्याख्यानाचा लाभ घेतला.
ऐरोली येथे श्री रौद्र प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांकडून सप्ताहातून एकदा धर्मशिक्षण वर्ग घेण्याची मागणी
नवी मुंबई : ऐरोली सेक्टर १६ मधील श्री रौद्र शंभो प्रतिष्ठानचे कार्यकर्ते प्रत्येक रविवारी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करण्यासाठी एकत्र येतात. ३० एप्रिलला आरती झाल्यानंतर प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. प्रीतम होवाळ यांनी बाजीप्रभू देशपांडे मैदानात कार्यकर्त्यांना एकत्रित केले. या वेळी समितीचे डॉ. लक्ष्मण जठार यांनी ‘सध्याची हिंदूंची स्थिती आणि हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ यावर मार्गदर्शन केले. व्याख्याना नंतर कार्यकर्त्यांनी सप्ताहातून एकदा धर्मशिक्षण वर्ग घेण्याची मागणी केली. श्री. जठार म्हणाले, ‘‘हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांना मावळ्यांनी मोलाची साथ दिली. त्याप्रमाणे या ईश्वरी कार्यात स्वत:चा उद्धार करण्यासाठी प्रत्येकाने काही वेळ राष्ट्र-धर्म कार्याला द्यायला हवा.’’
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात