मुस्लिम राष्ट्रीय मंचाच्या वतीने मुस्लिम कुटुंबीयांना सांगणार गायीचे फायदे
नवी देहली – राष्ट्रीय स्वंयसेवक संघ (आरएसएस) प्रणित मुस्लिम राष्ट्रीय मंचाच्या वतीने मुस्लिम कुटुंबीयांना गायीचे फायदे सांगून त्या दत्तक घेण्याचे अपील करण्यात येणार आहे. रूरकीनजीक पीरन कलियारमध्ये दि. ५ आणि ६ मे रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सुमारे ३०० मौलवी सहभागी होणार असल्याचे वृत्त ‘इकॉनॉमिक टाइम्स’ने दिले आहे. या वृत्तानुसार दोन दिवसांच्या या कार्यक्रमात अयोध्या येथील बाबरी मशिदीच्या वादग्रस्त जमिनीवर राम मंदिर बनवण्यावर आणि तिहेरी तलाकवरही चर्चा होणार आहे.
१३ व्या शतकातील चिश्तिया सुफी अलाउद्दीन अली अहमद साबीर कलयारी यांचा पीरन कलियार येथे दर्गा आहे. याला साबीर पाकही म्हटले जाते. मुस्लिम राष्ट्रीय मंचचे संरक्षक आणि आरएसएसचे ज्येष्ठ प्रचारक इंद्रेश कुमार हे या विषयांवर मुस्लिम समुदायात एकमत बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. मुस्लिम समुदायातील लोकांना भेटून त्यांचे एकमत बनवण्याचा या बैठकी मागचा हेत असल्याचे इंद्रेश कुमार यांनी सांगितले. कुराणमध्येही गायीचे मांस खाणे निषिद्ध असल्याचे ते म्हणाले.
अरबमधील लोकांनी फारपूर्वीच गोमांस खाण्यावर बंदी घातली होती. देशात सुमारे १५० मुस्लिम परिवार गोशाळा चालवतात, अशी माहिती त्यांनी दिली. कुराणाचे शिक्षण देणाऱ्या मदरशांमध्ये विद्यार्थ्यांना ‘भारतीय परंपरा’ही शिकवल्या पाहिजेत, असे इंद्रेश कुमार म्हणाले.
स्त्रोत : लोकसत्ता