बामणी (जिल्हा कोल्हापूर) : देशभर लव्ह जिहाद, भूमी जिहाद, हिंदूंचे धर्मांतर, मंदिरांचे सरकारीकरण इत्यादी रूपात हिंदूंवर मोठ्या प्रमाणात संकटे आली आहेत. त्यासाठी हिंदूंनी संघटित होऊन रामराज्याप्रमाणे असणार्या हिंदु राष्ट्राची निर्मिती करायला हवी. यासाठी शिवजयंतीनिमित्त आणलेली शिवज्योत हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी वर्षभर हृदयात तेवत ठेवा, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण दुसे यांनी केले. कागल तालुक्यातील बामणी येथे शिवगर्जना ग्रुप मंडळाच्या वतीने शिवजयंतीनिमित्त संयुक्त शिवजयंती उत्सव सोहळ्यात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते शिवकालीन स्थिती, शिवरायांनी निर्माण केलेले हिंदवी स्वराज्य, आताची स्थिती आणि हिंदु राष्ट्राची आवश्यकता या विषयावर बोलत होते.
कार्यक्रमात प्रारंभी हिंदु जनजागृती समितीच्या कार्याची ओळख हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रीतम पवार यांनी करून दिली. या वेळी शालेय शिक्षण व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष श्री. बाबुराव मगदूम, कोईंगडे दूध संस्थेचे अध्यक्ष श्री. युवराज कोईंगडे, प्रा. रवींद्र मगदूम, भिकाजी मगदूम, शिवगर्जना ग्रुपचे कार्यकर्ते यांसह ६० हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.
क्षणचित्रे
१. कार्यक्रमाचे आयोजन हिंदुत्वनिष्ठ श्री. विकी मगदूम यांनी पुढाकार घेऊन केले होते.
२. कार्यक्रमानंतर २०-२२ मुले चर्चेसाठी थांबली होती. या वेळी हिंदु राष्ट्राच्या संदर्भातील प्रश्नांची चर्चा करण्यात आली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात