पुणे येथे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘हिंदु राष्ट्रजागृती अभियाना’ची माहिती देणारी पत्रकार परिषद
संपूर्ण भारतात हिंदु राष्ट्राविषयी जागर होण्यासाठी सर्व स्तरातील संघटनांनी एकत्रितपणे अभियान आरंभले ! – पराग गोखल
सनातन संस्थेचे संस्थापक आणि ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’चे प्रेरणास्रोत असलेले परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने भारतभरामध्ये ‘हिंदु राष्ट्रजागृती अभियान’ आरंभले आहे. त्या निमित्ताने संपूर्ण भारतात हिंदु राष्ट्राविषयी जागर होण्यासाठी सामाजिक, राष्ट्रीय आणि धार्मिक क्षेत्रांत कार्यरत विविध संघटनांनी एकत्रितपणे ‘हिंदु राष्ट्रजागृती अभियान’ आरंभले आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले आणि अन्य संतांच्या कृपाशीर्वादानेच समितीने हाती घेतलेल्या ‘खडकवासला जलाशय रक्षण अभियान’ आणि संस्कृतीद्रोही ‘सनबर्न फेस्टिव्हल’ला विरोध करणे या आणि अशा अनेक मोहिमा यशस्वी झाल्या आहेत.
गीतेच्या साराप्रमाणे सनातन संस्था आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे कार्य चालू आहे ! – विद्याधर नारगोलकर, अध्यक्ष, पुणे
सार्वजनिक सभापुणे : हिंदु राष्ट्राविषयी जागृती निर्माण व्हावी, यासाठी एखाद्या संतांचा अमृत महोत्सव साजरा केला जाणे, हे ऐतिहासिक आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे कार्य बालक, महिला, युवक आणि वृद्ध असे सर्व स्तरांत आहे. त्यातही क्रांतिकारकांच्या गाथा आणि शौर्यजागरण करणे या स्तरांतही त्यांचे कार्य आहे. समर्थ रामदासस्वामी यांनी म्हटले आहे, ‘‘मुख्य सूत्र ते हाती घ्यावे । कामे लोकाकरवी करावे ॥ कित्येक खलक उगवासे । राजकारणांमध्ये ॥’’ याप्रमाणे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे कार्य आहे. समर्थ रामदास स्वामी यांच्याप्रमाणेच ते ‘महंते महंत निर्माण करावे’, असेही कार्य करत आहेत. गीतेचे सार ‘खंडण नसून मंडण’ असे आहे आणि तेच पुढे नेण्याचे कार्य सनातन संस्था आणि परात्पर गुरु डॉ. आठवले करत आहेत, असे कृतज्ञतापूर्ण प्रतिपादन पुणे सार्वजनिक सभेचे अध्यक्ष श्री. विद्याधर नारगोलकर यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हिंदु राष्ट्र-जागृती अभियाना’ची माहिती देणार्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले, सनातन संस्थेचे श्री. शंभू गवारे आणि गार्गी फाऊंडेशनचे श्री. गावडे उपस्थित होते.
अमृत महोत्सवाच्या निमित्ताने केलेला प्रसार हा साधकांनी गुरूंप्रती व्यक्त केलेला कृतज्ञताभाव ! – शंभू गवारे
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा अमृत महोत्सव हा शिष्य आणि साधक यांना कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मिळालेली एक संधी आहे. त्या निमित्ताने केलेला प्रसार हा साधकांनी गुरूंप्रती व्यक्त केलेला कृतज्ञताभाव आहे. परात्पर गुरूंनी सांगितलेल्या ‘गुरुकृपायोगानुसार साधना’ या साधना मार्गावरून सहस्रो साधक वाटचाल करून अनेक संत आणि साधक निर्माण होत आहेत. तसेच त्यांनी सर्व प्राणिमात्रांचे भले व्हावे, म्हणून ‘हिंदु राष्ट्राचा’ संकल्प केला आहे. सर्व संप्रदाय, आध्यात्मिक, हिंदुत्वनिष्ठ आणि सामाजिक संघटना या संतांच्या अमृत महोत्सवासाठी संघटित होऊन देशभर विविध कार्यक्रम आयोजित करत आहेत.
काळेवाडी (पिंपरी) आणि पुणे शहर येथे भव्य ‘हिंदु एकता दिंडी’चे आयोजन !
अमृत महोत्सवाच्या निमित्ताने पिंपरी येथील काळेवाडी भागात ७ मे, तर पुणे येथेही १४ मे या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता ‘भव्य हिंदु एकता दिंडी’चे आयोजन करण्यात आले आहे. काळेवाडी येथील दिंडीचा प्रारंभ डी-मार्ट मॉल येथून होणार असून सांगता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, पिंपरीगाव येथे होणार आहे. पुणे येथील दिंडी सारसबागेपासून कसबा गणपति मंदिरापर्यंत काढण्यात येणार आहे. यामध्ये शौर्य जागरण करणारे मर्दानी खेळ, राष्ट्र-धर्म यांविषयीचे उद्बोधक फलक, चित्ररथ, बालपथक, वारकर्यांची दिंडी आणि विविध आध्यात्मिक संस्थेची पथके आदींचा समावेश असणार आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या दिंडीमध्ये विविध सामाजिक, देशभक्त आणि धार्मिक संघटनांचे पदाधिकारी-कार्यकर्ते ‘एक हिंदू’ म्हणून सहभागी होणार आहेत.
अभियानाच्या अंतर्गत पुणे जिल्ह्यात आयोजित केलेले विविध उपक्रम
- ४८० हून अधिक ठिकाणी व्याख्याने
- ५ हून अधिक ठिकाणी ‘युवा शौर्य जागरण शिबिरे’
- १०० हून अधिक ठिकाणी ‘हिंदु राष्ट्रजागृती सभा’
- ३०० हून अधिक ठिकाणी सनातनच्या ग्रंथांचे प्रदर्शन
श्री. विजय गावडे यांनी सांगितले की, मोरवाडी येथे १८ मे या दिवशी युवकांसाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच १४ मे या दिवशी होणार्या भव्य ‘हिंदु एकता दिंडी’मध्ये फाऊंडेशनचे सर्व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.
अभियानाच्या अंतर्गत पुणे जिल्ह्यात आयोजित केलेले विविध उपक्रम
- मंदिरे आणि राष्ट्रपुरुषांची स्मारके यांची स्वच्छता
- १५ हून अधिक शाळा-महाविद्यालयांत हिंदु राजे, राष्ट्रपुरुष अन् क्रांतीकारक यांच्या फलकांचे प्रदर्शन
- समाज जागृती करणारी माहिती अधिकार शिबिरे
- शहरात विविध ठिकाणी रक्तदान शिबिरे
पत्रकार परिषदेचे ‘फेसबूक’वरून प्रक्षेपण !
या पत्रकार परिषदेचे ‘फेसबूक’ या सामाजिक संकेतस्थळावरून प्रसारण करण्यात आले. ते ९ सहस्र ६८३ जणांनी पाहिले.
तेलंगणमध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे राष्ट्र आणि धर्म यांविषयीचे विचार फलक लावून प्रसारित करण्याचा अभिनव उपक्रम
तेलंगणमध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांची महती सांगणारे ८० फलक लावण्याचे नियोजन
भाग्यनगर : फलक आणि होर्डिंग हे प्रसाराचे अभिनव माध्यम आहे. विविध आस्थापने त्यांच्या उत्पादनांचा प्रसार करण्यासाठी, तर राजकीय पक्ष त्यांचे विचार लोकांपर्यंत प्रसारित करण्यासाठी शहरे, गावे येथील गर्दीच्या ठिकाणी, दर्शनी भागात फलक लावण्यात येतात. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या राष्ट्र आणि धर्म कार्याविषयीच्या विचारांचा सर्वत्र प्रसार व्हावा, यासाठी त्यांच्या सुवचनांचे ८० फलक राज्यभर लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचा पहिला टप्पा म्हणून विशाखापट्टणम शहरात १० फलक लावण्यात आले आहेत. गर्दीच्या ठिकाणी प.पू. डॉक्टरांचे विचार प्रसृत करणारे होर्डिंगही लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
समाजातील महनीय व्यक्ती किंवा इतर राजकारणी अथवा कलाकार हे त्यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने स्वतःला केंद्रभूत ठेवून कार्यक्रम आयोजित करतात; मात्र राष्ट्र आणि धर्म यांसाठी अहोरात्र झटणारे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले हे मात्र असे काही न करता हिंदुत्वनिष्ठांना राष्ट्र आणि धर्म यांसाठी कृती करण्यासाठी प्रेरणा देतात. त्यांच्या कृपेमुळेच या उपक्रमांना सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. यासाठी त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करू, तेवढी अल्पच !
तेलंगणमधील अन्य उपक्रम
१. १५ व्याख्यानांचे नियोजन
२. २ सभा
३. माहिती अधिकाराच्या शिबिराचे आयोजन
४. राज्यात ८० फलक लावणार
५. होर्डिंग लावण्याचेही नियोजन
धर्मशिक्षण वर्गातील धर्माभिमान्यांकडून प्रसार
निजामाबादधील इंदूर येथील बीबीसी हायस्कूल येथे ‘साधना आणि हिंदु राष्ट्र’ या विषयावर व्याख्यान घेण्यात आले. या वेळी २५ धर्माभिमानी उपस्थित होते. धर्मशिक्षण वर्गात येणार्या धर्माभिमानी युवकांनी या व्याख्यानाचा प्रसार केला.
बोधन शहरातही व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्याला ७० धर्माभिमानी उपस्थित होते.
परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त फरिदाबाद (हरियाणा) येथे प्रवचन
फरिदाबाद (हरियाणा) : येथील एन्आयआयटी-३ मध्ये श्रीमती शिल्पा चलकर यांच्या घरी आयोजित करण्यात आलेल्या हळदी कुंकू कार्यक्रमात सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रवचन घेण्यात आले. या प्रवचनात अक्षय्य तृतीयेचे महत्त्व, परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे कार्य, वैशिष्ट्ये, हिंदु राष्ट्राची आवश्यकता आणि साधना या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी परिसरातील महिला उपस्थित होत्या. शहरात तसेच अन्य ठिकाणीही विविध उपक्रम राबबवण्यात येणार आहेत.
मंगळुरू, कर्नाटक येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात ‘व्यक्तिमत्त्व विकास’ या विषयावर व्याख्यान
मंगळुरू : ‘कादरी हिल्स’ येथील ‘इंडस्ट्रीयल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट येथे ‘व्यक्तिमत्त्व विकास’ या विषयावर व्याख्यान घेण्यात आले. या व्याख्यानाचा ४०० विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. ‘गुणसमृद्धी आणि स्वभावदोष निर्मूलन यांच्या माध्यमातून व्यक्ती आणि समाज यांचा आध्यात्मिक स्तर वाढवण्यासाठी सनातन संस्था कार्य करत आहे. धर्माचरणामुळेच समाजाची उन्नती होते. आज समाजात ज्या विकृती निर्माण होत आहेत, त्याचे मूळ कारण अधर्माचरण आहे. समाजाने साधना केली, तरच त्याचा खरा विकास होतो’, असे प्रतिपादन सनातन संस्थेच्या सौ. लक्ष्मी पै यांनी केले. औद्योगिक संस्थेच्या प्राध्यापकांनी ‘येथील शिक्षकांसाठी व्याख्यान आयोजित करणार’, असे सांगितले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात