मुबंर्इ : एलफिन्स्टन रोड रेल्वे स्थानकाचे नाव प्रभादेवी करण्यात यावे त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी टर्मिनसचे नाव छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असे करण्यात यावे या मागणीसाठी शिवसेनेने सतत पाठपुरावा केला. केंद्र सरकारकडे केलेल्या या पाठपुराव्याला यश आले असून राज्य शासनाने या दोन्ही स्थानकांची सुधारित नावे इंग्रजी आणि देवनागरी लिपीत राजपत्रात प्रसिद्ध करून त्याप्रमाणे नावांमध्ये बदल करावेत असे केंद्रीय गृहविभागाने कळविले आहे अशी माहिती परिकहनमंत्री दिवाकर रावते यांनी आज दिली.
एलफिन्स्टन रोडचे नाव प्रभादेवी व्हावे त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी टर्मिनसचे नाव छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस व्हावे ही राज्यातील जनतेची भावना होती. शिवसेनेने १९९१ पासून म्हणजे २६ वर्षे यासाठी पाठपुरावा केला. राज्य व केंद्रात सत्ता आल्यानंतर यासाठी अधिक प्रयत्न करण्यात आले. अखेर या २६ वर्षांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. त्यामुळे पुढील प्रक्रिया पूर्ण करून दोन्ही स्थानकांच्या नावांत तातडीने बदल करण्यात येतील असे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी सांगितले.
संदर्भ : सामना