हिंदु जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या विरोधाचा परिणाम !
केवळ आदेशात पालट नको, तर असे तुघलकी आदेश काढणार्यांवर शासनाने कारवाई करायला हवी ! आदेश अंतिम करणारा अधिकारी मराठी भाषिक नव्हता कि त्याला राज्याच्या जनतेचा अपमान करायचा होता ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
मुंबई : राष्ट्रपुरुष आणि थोर व्यक्ती यांचा पुतळा उभारण्यासाठी घ्यावयाच्या अनुमतीची मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करणारे धोरण राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने २ मे या दिवशी जारी केले होते. त्यामध्ये ‘राज्यात पुतळा उभारणीसाठी अल्पसंख्यांकांकडून लेखी ‘ना हरकत प्रमाणपत्र’ आणावे’, असे म्हटले होते. शासनाच्या त्या निर्णयावर हिंदु जनजागृती समिती, हिंदु विधीज्ञ परिषद आणि अन्य विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी विरोध दर्शवला. त्याचा परिणाम म्हणून सामान्य प्रशासन विभागाने ६ मे या दिवशी नवीन अधिसूचना प्रसिद्ध केली. त्यामध्ये शासनाने पुतळ्याच्या उभारणीसाठी अल्पसंख्यांकांच्या ‘ना हरकती’ची अट वगळत पुतळ्याला स्थानिकांचा विरोध नसल्याचा अहवाल देण्याची अट तशीच ठेवली आहे. असे असले, तरी नवीन आदेशानेही घोळ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (एक अध्यादेशही नीट काढू न शकणारे शासन जनहितकारी राज्यकारभार कसा करणार ? ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
पुतळे उभारण्यासाठी पालट केलेले नवीन कलम
‘पुतळा उभारल्यामुळे भविष्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, स्थानिक वाद किंवा जातीय तणाव वाढणार नाही, याविषयी सविस्तर चौकशी करून संबंधित पोलीस कार्यालय प्रमुखांचे ना-हरकत प्रमाणपत्र प्रस्तावासह जोडणे आवश्यक आहे. तसेच पुतळा उभारण्यासाठी स्थानिक लोकांचा विरोध नसल्याविषयीचा अहवाल प्राप्त करून देण्यात यावा.’
शिवस्मारकास स्थानिक कोळी समाजाचा विरोध आहे; म्हणून शासन पुतळा उभारणे रहित करणार का ? – श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती
शासनाने पुतळ्याला स्थानिकांचा विरोध नसल्याचा अहवाल देण्याची अट तशीच ठेवली आहे. असे आहे, तर मग मुंबईतील समुद्रातील प्रस्तावित शिवस्मारकासाठी स्थानिक कोळी समाजाचा विरोध आहे, तर तिथे या सुधारित अधिसूचनेनुसार हे शिवस्मारक आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणे सरकार रहित करणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे, असा प्रश्न हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात केला आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात