इस्लामाबाद : पाकिस्तानातील एका नागरिकाने भारतीय महिलेशी बंदुकीच्या धाकावर लग्न केल्याची बाब उघडकीस आली आहे. उज्मा हिने पतीविरोधात इस्लामाबाद न्यायालयात एक याचिकाही दाखल केली आहे. याचिकेत पती ताहीर अली हा त्रास देऊन धमक्या देत असल्याचे तिने म्हटले आहे. तसेच दंडाधिका-यांसमोर तिने स्वतःचा जबाबही नोंदवला आहे. पतीने माझे इमिग्रेशन दस्तावेज हिसकावल्याचेही तिने सांगितले आहे. उज्माला जोपर्यंत सुखरूप भारतात परत पाठवले जात नाही, तोपर्यंत तिने भारतीय दूतावास सोडण्यास नकार दिला आहे. उज्मा ही स्वतःच्या मर्जीने तिथे राहतेय आणि पाकिस्तान परराष्ट्र कार्यालयाशी बातचीत केल्यानेतर तिला बाहेर जाण्याची परवानगी देण्यात येईल, असे भारतीय दूतावासाने सांगितले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, त्या पीडित महिलेने ५ मे रोजी भारतीय उच्चायुक्तालयाकडे मदत मागितली होती आणि तिला आवश्यक मदत पुरवली जाणार आहे.
पाकिस्तानातील पती ताहीर अलीने भारतीय उच्चायुक्तालयावर भारतीय पत्नीला ताब्यात घेतल्याचा आरोप केला आहे. आम्ही दोघेही व्हिसा घेण्यासाठी भारतीय दूतावासात गेलो होतो. त्यावेळी पत्नी अचानक बेपत्ता झाली, असे त्याने सांगितले आहे. उज्मा आणि ताहिर अली यांची ओळख मलेशियामध्ये झाली होती. त्याच वेळी दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळून आले. त्यानेतर उज्मा १ मे रोजी वाघा-अटारी सीमेवरून पाकिस्तानात दाखल झाली आणि त्यांनी ३ मे रोजी निकाह केला.
मात्र पाकिस्तानी वृत्तपत्र न्यूज इंटरनॅशनलच्या रिपोर्टनुसार, दोघे जण उच्चायुक्तालयात गेले होते. त्यावेळी त्यांनी स्वतःचा व्हिसा फॉर्म आणि फोन अधिका-यांकडे सुपूर्द केला. अधिका-यांनी बोलावल्यानंतर उज्मा बिल्डिंगच्या आत गेली, तिचा पती त्यावेळी बाहेरच होता. ब-याच वेळ झाला तरी उज्मा न आल्याने अखेर पतीने बिल्डिंगमध्ये प्रवेश केला. मात्र भारतीय उच्चायुक्तालयाने उज्मा इथे नसल्याचे सांगितले. तसेच अधिका-यांनी त्यांचे तीन मोबाईल फोनही परत केले नाहीत.
संदर्भ : लोकमत