परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्ताने ‘हिंदु राष्ट्र जागृती अभियान’
पाली (जिल्हा रायगड), १० मे (वार्ता.) – परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या ‘हिंदु राष्ट्र जागृती अभियाना’च्या अंतर्गत ‘हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी, परात्पर गुरु डॉ. आठवले यांना उत्तम आरोग्य लाभावे, तसेच भारतीय जनतेकडून सनातन धर्मसंस्कृतीचे संवर्धन व्हावे आणि विश्वकल्याणासाठी सात्त्विक राज्यकर्ते निर्माण व्हावेत’ यांसाठी अष्टविनायकांपैकी एक असणार्या पाली (जिल्हा रायगड) येथील श्री बल्लाळेश्वराच्या चरणी हिंदुत्वनिष्ठांकडून साकडे घालण्यात आले. या वेळी जमलेल्या सर्व हिंदुत्वनिष्ठांनी हिंदु राष्ट्रासाठी कटिबद्ध रहाण्याची प्रतिज्ञा केली. या वेळी ‘हिंदु राष्ट्र स्थापन होईपर्यंत हे कार्य करत राहू’, असा निर्धार व्यक्त करण्यात आला.
श्री. विदेश आचार्य यांनी पुढाकार घेऊन साकडे घालण्याची सिद्धता केली. श्री. राजेंद्र राऊत यांच्या हस्ते श्रींची पूजा करण्यात आली. प्रतिज्ञा आणि प्रार्थना झाल्यावर अखेरीस छत्रपती शिवाजी महाराज आणि श्रीराम यांचा जयघोष करण्यात आला.
क्षणचित्रे :
१. या वेळी शिवसेनेच्या महिला आघाडीच्या सुधागड तालुकाध्यक्ष आणि महिला दक्षता समितीच्या सदस्या सौ. संगीता प्रमोद खोडग्ले यांनी ‘पुढे महिलांसाठी उपक्रम घ्यावेत’, अशी मागणी केली.
२. या वेळी दर्शनाला आलेले सर्व गणेशभक्तही हात जोडून प्रतिज्ञा म्हणत होते.
३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासाठी श्री गणेशाचा प्रसाद म्हणून श्रीफळ आणि विभूती देण्यात आली.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने पुण्याचे ग्रामदैवत श्री कसबा गणपतीच्या चरणी धर्माभिमान्यांनी केली भावपूर्ण प्रार्थना !
पुणे शहरात होणार्या ‘हिंदु एकता दिंडी’च्या प्रसारास प्रारंभ
पुणे, १० मे (वार्ता.) – परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने राबवण्यात येणार्या ‘हिंदु राष्ट्र-जागृती अभियान’ अंतर्गत पुण्याचे ग्रामदैवत श्री कसबा गणपतीच्या मंदिरात जाऊन ‘हिंदु राष्ट्र स्थापना’ आणि पुणे शहरात १४ मे या दिवशी होणारी ‘हिंदु एकता दिंडी’ यांसाठी धर्माभिमान्यांनी ७ मे या दिवशी भावपूर्ण प्रार्थना केली. याद्वारे धर्माभिमान्यांनी दिंडीच्या प्रसारास प्रारंभ केला. या वेळी गार्गी फाऊंडेशनचे श्री. विजय गावडे, फाऊंडेशनच्या सदस्या सौ. सुहासिनी गावडे, धर्माभिमानी सर्वश्री हनुमंत आंबिवाडीकर, सुरेंद्र कुंभार, मिलींद देशपांडे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. दीपक आगवणे यांसह १० हून अधिक धर्माभिमानी महिला आणि हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.
प्रार्थनेच्या प्रारंभी श्री. आणि सौ. गावडे यांनी श्री गणेशाच्या चरणी दुर्वा, पुष्पहार आणि श्रीफळ अर्पण करत पूजन केले. त्यानंतर ६१ टक्के आध्यात्मिक स्तर असलेले श्री. आगवणे यांनी उपस्थितांना श्री गणेशाच्या चरणी प्रार्थना सांगितली आणि त्यानंतर जयघोष करण्यात आला. या वेळी करण्यात आलेली प्रार्थना –
‘‘हे श्री गणेशा, हिंदु राष्ट्र स्थापनेच्या धर्मकार्यात येणारी सर्व विघ्ने आणि अडथळे दूर व्हावेत, तसेच परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने १४ मे या दिवशी पुणे शहरामध्ये आयोजित केलेल्या ‘हिंदु एकता दिंडी’च्या प्रसाराचा प्रारंभ या निमित्ताने करत आहोत. ही दिंडी निर्विघ्न पार पडावी, अशी प्रार्थना !’’
त्यानंतर ‘गणपति बाप्पा मोरया ।’, ‘प.पू. भक्तराज महाराजांचा विजय असो ।’, ‘भगवान श्रीकृष्णाचा विजय असो ।’, ‘जय गुरुदेव ।’ असे जयघोष करण्यात आले.
क्षणचित्र
श्री कसबा गणपति मंदिरामध्ये छायाचित्रे काढण्यास मनाई आहे. हिंदु जनजागृती समितीचे श्री. आगवणे यांनी तेथे उपस्थित असलेल्या पुजार्यांना ‘‘हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी हिंदुत्वनिष्ठांकडून श्री गणेशाला प्रार्थना करण्यात येणार आहे. तरी त्याचे छायाचित्र आम्ही काढू शकतो का ?’’, अशी विनंती केली. त्यावर त्या पुजार्यांनी तात्काळ ‘होकार’ दिला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात