परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्ताने ‘हिंदु राष्ट्र जागृती अभियान’
अमरावती : व्यक्ती, समाज आणि राष्ट्र यांतील चैतन्य वाढल्यावर हिंदु राष्ट्र अवतरणार आहे. असे चैतन्यदायी, सर्वांना आनंद देणारे हिंदु राष्ट्र आणण्यासाठी सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले अहोरात्र झटत आहेत. त्यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने ‘हिंदु राष्ट्र जागृती अभियाना’च्या अंतर्गत विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्यांतीलच एक म्हणजे हिंदू ऐक्य दिंडी ! हिंदु राष्ट्र स्थापनेचे ध्येय उराशी बाळगून कार्यरत असणार्या हिंदुत्वनिष्ठ मावळ्यांनी अमरावती येथे ११ मे या दिवशी ‘हिंदू ऐक्य दिंडी’ काढली. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने हिंदु ऐक्याचा, तसेच धर्मकार्य हे साधना म्हणून करण्याचा संदेश देत काढण्यात आलेली ही अभूतपूर्व दिंडी नागरिकांना प्रेरणा देणारी, तर सहभागी हिंदुत्वनिष्ठांना धर्मकार्यासाठी चैतन्य प्रदान करणारी ठरली. या दिंडीत सहभागी झालेले हिंदुत्वनिष्ठ चैतन्याने भारित झाले होते. दिंडीच्या शेवटी झालेल्या समारोपीय भाषणाच्या माध्यमातून उपस्थित सर्वांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी झोकून देऊन धर्मकार्य करण्याचा निर्धार केला.
दिंडीचा आरंभ धर्मध्वजाचे पूजन करून करण्यात आला. विश्व हिंदु परिषदेचे श्री. शरदजी अग्रवाल, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. अभिषेक दीक्षित, भाजपच्या नगरसेविका सौ. संगीता बुरंगे, शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख सौ. सुनीता येवतकर, नगरसेवक श्री. आशिष अतकरे यांनी धर्मध्वजाचे पूजन केले.
त्यानंतर दिंडीच्या मार्गात गांधी चौक येथे जय फोटो स्टुडिओचे मालक श्री. वैभव दलाल, श्री. दीपक व्यवहारे यांनी प्रभात चौक येथे जोशी ब्रदर्स, जयस्तंभ चौक येथे वंदना साडी सेंटरचे मालक, नीलकमल साडी, मंगल वस्त्रालय, अमरावती ठोक कापड व्यापार संघटनाचे अध्यक्ष श्री. नंदलालजी खत्री यांनी धर्मध्वजाचे पूजन केले.
दिंडीच्या आरंभी काही रणरागिणी हातात दंड घेऊन, बालसाधक पारंपरिक वेशभूषेत हातात भगवे ध्वज घेऊन, तर भजनी मंडळाच्या महिला टाळ वाजवत दिंडीमध्ये सहभागी झाल्या होत्या. दिंडीत हिंदु जनजागृती समितीचे श्री. अमोल जगदाळे आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. करण धोटे हे लाठी-काठी आणि नानचाकू यांचे प्रात्यक्षिक करून दाखवत होते. दिंडीत मध्ये मध्ये पुष्पवृष्टी करण्यात येत होती. या दिंडीचा आरंभ स्थानिक श्री एकवीरादेवीच्या मंदिराच्या प्रांगणातून झाला, तर सीताराम बाबा मार्केट येथे तिची सांगता करण्यात आली.
दिंडीच्या अखेरीस ह.भ.प. श्री पातशे महाराज म्हणाले, ‘‘धर्माला ग्लानी आल्याने डॉ. आठवले हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य करत आहेत. त्यांच्या या कार्यात माझा नेहमीच सहभाग असेल. त्यांचे कार्य अतिशय योग्य आहे.’’
श्री योग वेदांत सेवा समितीचे श्री. मानव बुद्धदेव म्हणाले, ‘‘बापूजींना अटक झाल्यापासून प.पू. डॉ. आठवले आमचा आधार आहेत. ते आमचे प्रेरणास्थान आहेत. त्यांच्यामुळेच बापूजींच्या अटकेविरुद्ध आम्ही आवाज उठवू शकत आहोत’’
श्री. अभिषेक दीक्षित म्हणाले, ‘‘माझा नेहमीच सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्यात सहभाग असेल. सर्वांनी हिंदु राष्ट्र्र स्थापनेच्या कार्यात संघभावाने एकत्रित यावे, असे मी आज या दिंडीच्या निमित्ताने आवाहन करतो.’’
हिंदु जनजागृती समितीचे श्री. हेमंत खत्री यांनी दिंडीचा उद्देश उपस्थितांना सांगितला आणि ‘हिंदु राष्ट्र स्थापनेची आवश्यकता’ या विषयावर मार्गदर्शन केले.
मान्यवरांच्या प्रतिक्रिया
१. अंबादेवी संस्थानचे माजी अध्यक्ष डॉ. प्रदीप शिंगोरे यांनीही दिंडीला भेट दिली आणि शुभेच्छा व्यक्त करतांना ते म्हणाले, ‘‘सनातन संस्थेचे कार्य मी जवळून पाहिले आहे. सनातन अतिशय उत्तम धर्मकार्य करते. संस्थेच्या कार्याला माझ्या शुभेच्छा आहेत.’’
२. भाजपचे नगरसेवक श्री. आशीष अतकरे म्हणाले, ‘‘मी आतापर्यंत सनातन संस्थेविषयी केवळ ऐकून होतो; परंतु सनातन संस्थेचे कार्य एवढे चांगले आहे, हे मला माहीतच नव्हते. ते आज कळले. सनातनच्या कोणत्याही कार्यात माझा सहभाग असेल. माझे साहाय्य लागेल, तेव्हा मला सांगा.’’
३. भाजपच्या नगरसेविका सौ. संगीता बुरंगे आणि शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख सौ. सुनीता येवतकर म्हणाल्या, ‘‘सनातनला माझे साहाय्य लागल्यास मी नक्की करीन. मी नेहमी तुमच्यासोबत आहे.’’
४. काँग्रेसच्या महिला जिल्हाप्रमुख सौ. रश्मी उपाध्ये यांनीही दिंडी आवडल्याचे सांगितले.
अर्पण !
जय फोटो स्टुडिओचे श्री. वैभव दलाल आणि त्यांच्या मातोश्री सौ. शोभा दलाल यांनी दिंडीमधील धर्माभिमान्यांना सरबताचे, जोशी ब्रदर्स यांनी पाण्याचे, तर शिवशक्ती आईस्क्रीम या आस्थापनाच्या मालकांनी आईस्क्रीमचे विनामूल्य वाटप केले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात