स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे, ही काळाची आवश्यकता असल्याचे सौ. अंजली मणेरीकर यांचे प्रतिपादन
कारिवडे : गुंड, बलात्कारी आणि धर्मांध यांसारख्या मूठभर दुष्प्रवृत्ती आज संपूर्ण समाजावर सत्ता गाजवत आहेत. सर्वत्र केवळ महिलांचाच नाही, तर आत्मबळ नसलेल्या प्रत्येकाचा छळ होत आहे. याचा वैध मार्गाने प्रतिकार करायचा असेल, तर सर्वांनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे, ही काळाची आवश्यकता झाली आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समिती प्रणित रणरागिणी शाखेच्या सौ. अंजली मणेरीकर यांनी येथे केले.
हिंदु राष्ट्र जागृती अभियानाच्या अंतर्गत सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे येथे श्री. हरिचंद्र तेली यांच्या घरी ‘शौर्य जागरण’ शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याचा प्रारंभ ग्रामपंचायत सदस्य श्री. तुकाराम आमुणेकर आणि कारिवडे गावचे प्रमुख मानकरी श्री. बाबा गावकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. शरद राऊळ यांनी केले. या व्याख्यानाचा लाभ एकूण ६० धर्माभिमानी महिला आणि पुरुष यांनी घेतला. शिबिरानंतर उपस्थितांनी ‘गावात स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्ग चालू करावा’, असे सांगितले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात