मंदिर स्वच्छता अभियानात सहभागी होणे, हे धर्मकर्तव्य !
हिंदूंची मंदिरे ही चैतन्याचा स्रोत आहेत. हा स्रोत टिकवून ठेवला, तर मंदिराचे पावित्र्य, मांगल्य टिकून रहाते. अशा जागृत मंदिरांमध्ये गेल्यास आपोआप भावजागृती होते. त्यामुळे आपल्या आजूबाजूला असलेल्या मंदिरांची स्वच्छता करण्यास सहकार्य करणे, हे हिंदूंचे धर्मकर्तव्यच आहे.
हल्ली प्रशासकीय यंत्रणांकडून मंदिरांच्या देखभालीकडे दुर्लक्ष केले जाते. मंदिरांकडेही देखभालीसाठी पुरेसा निधी नसतो. त्यामुळे त्यांच्या नित्य स्वच्छतेसाठी अडचणी येतात. या पार्श्वभूमीवर हिंदूंनी असे उपक्रम राबवल्यास त्यांना ईश्वराचा नक्कीच आशीर्वाद मिळेल !
जळगाव येथील श्री दत्त आणि गणपति मंदिरांत स्वच्छतेत महिला भाविक सहभागी !
जळगाव : धार्मिक उपक्रमांसाठी आम्हाला कधीही बोलवा. आम्ही सर्वांना घेऊन येऊ, असे कृतीशील उद्गार येथील महिलांनी काढले. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त येथील श्री दत्त मंदिर आणि श्री गणपति मंदिर येथे स्वच्छता अभियान राबवण्यात आले.
या वेळी सौ. निलिमा वाघुळदे यांनी सांगितले की, देवालयाच्या स्वच्छतेमुळे १० दिशा चैतन्यमय होतात, यासाठी देऊळ नियमित स्वच्छ रहाण्यासाठी प्रयत्न करायला हवे. काही भ्रष्ट राज्यकर्त्यांचाही मंदिरांवर डोळा असतो. त्यांना दूरच ठेवायला हवे.
या अभियानात सौ. वसाने, सौ. पाटील, सौ. निलिमा वाघुळदे आणि पुजारी श्री. खंबायत, तसेच सौ. आशा शिंदे, सौ. माया मेढे, सौ. सुशीला पाटील यांच्यासह गणेशभक्तांनी सहभाग घेतला.
कळमना, नागपूर येथे महिला सरपंचांच्या पुढाकाराने मंदिर स्वच्छता उपक्रम !
कळमना : कळमना गावच्या सरपंच सौ. बेबीताई शिंगणे यांच्या पुढाकाराने ४ मे या दिवशी संकटमोचन हनुमान मंदिराची स्वच्छता करण्यात आली. या वेळी गावातील धर्माभिमान्यांनी एकत्र येऊन स्वच्छतेत सहभाग घेतला.
तासगाव, सांगली येथील नृसिंह मंदिराची स्वच्छता करण्यासाठी धर्माभिमान्यांचा पुढाकार
तासगाव (जिल्हा सांगली) : हिंदु राष्ट्र जागृती अभियानाच्या अंतर्गत सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने तासगाव येथील नरसोबा गल्ली येथील नृसिंह मंदिराची स्वच्छता करण्यात आली. नवीन धर्मशिक्षण वर्गातील धर्माभिम्यांनी पुढाकार घेऊन ही स्वच्छता केली. ही स्वच्छता करतांना मंदिराच्या विश्वस्तांनी त्यासाठी साहाय्य केले.
वर्धा येथे २९ धर्माभिमान्यांच्या पुढाकाराने ६ मंदिरांमध्ये स्वच्छता अभियान !
वर्धा : मंदिर स्वच्छता अभियानाला वर्ध्यात चांगला प्रतिसाद लाभला. येथील हिंदनगर, बोरगाव, सिंदी येथे ५ मे आणि ६ मे या दिवशी ६ ठिकाणी मंदिर स्वछता अभियान राबवण्यात आले, तसेच साधनेविषयी प्रवचन घेण्यात आले. मंदिर स्वच्छता अभियानात श्री गणेश मंदिर, मारुति मंदिर, विठ्ठल मंदिर, राधा-कृष्ण मंदिर, महाकाली मंदिर, दुर्गा मंदिर या मंदिरांचा समावेश होता. श्री गणेशाला सामूहिक प्रार्थना आणि ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।’ असा जयघोष करून स्वच्छतेस आरंभ करण्यात आला.समाजातील २९ धर्माभिमान्यांनी यात पुढाकार घेतला.
या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या सौ. माधुरी चिमुरकर, सौ. रत्ना हस्ती यांनी मंदिर स्वछता अभियानाचा उद्देश, तसेच परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या हिंदु राष्ट्र स्थापनेविषयीचे कार्य आणि वैशिष्ट्य सांगितले. कुलदेवतेच्या नामजपाचे महत्त्वही या वेळी सौ. भक्ती चौधरी यांनी विशद केले.
उपस्थिती
अभियानात गणेश मंदिराचे अध्यक्ष श्री. तळवेकर, श्री. अथर्व बंडेवार, श्री. आदित्य बंडेवार उपस्थित होते.
क्षणचित्रे
१. या अभियानात ९ धर्माभिमानी महिला स्वतःहून ३ ठिकाणी सहभागी झाल्या.
२. २ ठिकाणी धर्मशिक्षण वर्ग चालू करण्याची मागणी करण्यात आली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात