Menu Close

श्री तुळजाभवानी मंदिरातील रूढी, प्रथा आणि परंपरा यांची होणारी पायमल्ली थांबवा !

श्री तुळजाभवानी देवस्थान संरक्षक कृती समितीची शासनाकडे मागणी

तहसीलदारांना निवेदन देतांना श्री तुळजाभवानी देवस्थान संरक्षक कृती समितीचेे हिंदुत्वनिष्ठ

तुळजापूर (जिल्हा धाराशिव) : श्री तुळजाभवानी मंदिरातील रूढी, प्रथा आणि परंपरा यांची होत असलेली पायमल्ली थांबवून त्या पुन्हा धर्मशास्त्राप्रमाणे चालू कराव्यात, या मागणीसह विविध मागण्यांचे निवेदन श्री तुळजाभवानी देवस्थान संरक्षक कृती समितीच्या वतीने ११ मे या दिवशी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या नावे स्थानिक प्रशासनास देण्यात आले. प्रशासनाच्या वतीने नायब तहसीलदार नरसिंह जाधव यांनी हे निवेदन स्वीकारले.

या वेळी गरीबनाथ मठाचे मठाधीपती तथा श्री तुळजाभवानी संरक्षक कृती समितीचे महंत मावजीनाथ महाराज यांच्यासह कृती समितीचे सदस्य श्री. अर्जुन साळुंके, पुजारी मंडळाचे अध्यक्ष श्री. विपीन शिंदे, जनहित संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. अजयभैय्या साळुंके, जिल्हाध्यक्ष श्री. प्रशांत कदम, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. सचिन सूर्यवंशी, बजरंग दलाचे सर्वश्री अलोक शिंदे, विद्याधर सोनवणे, धनंजय बगडी, विनायक माळी, रोहन भांगी, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री विनोद रसाळ, अमित कदम, सर्वोत्तम जेवळीकर, संदीप बगडी आणि सुरेश नाईकवाडी हे उपस्थित होते.

श्री तुळजाभवानी देवस्थान संरक्षक कृती समितीने निवेदनाद्वारे केलेल्या मागण्या

१. सर्वच यात्राकाळात भाविकांना धर्मशास्त्र, रूढी, परंपरा यातून श्री शहाजी राजे महाद्वारातून प्रवेश द्यावा आणि सर्व भाविकांना कल्लोळ तीर्थ, श्रीगणेशाचे दर्शन यांचा पूर्ण लाभ मिळावा.

२. कल्लोळ तिर्थाकडे बूट घालून जाणारे अधिकारी आणि पोलीस यांच्यावर कारवाई व्हावी अन् निर्बंध घालण्यात यावे.

३. सुरक्षिततेच्या कारणांवरून सुरक्षा कर्मचार्‍यांकडून भाविक आणि पुजारी यांच्यावर होणारी दडपशाही बंद व्हावी अन् अशा सुरक्षा कर्मचार्‍यांवर कारवाई व्हावी.

४. मंदिरात सुरक्षेसाठी येणारे कर्मचारी आणि पोलीस यांना देवालयाशी संबंधित धर्मशिक्षण देऊन तेथे रुजू करावे. जेणेकरून त्यांच्याकडून मंदिर, पूजा, प्रसाद आणि नैवेद्य यांचे पावित्र्य भंग होणार नाही.

५. मातंगी द्वारातून भाविक बाहेर पडल्यावर पुढील रस्ता हा अतिक्रमणामुळे अरूंद झाला आहे. त्यामुळे अतिक्रमण हटवून रस्ता रूंद करावा.

प्रशासनाला दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की,

१. श्री तुळजाभवानी मंदिर हे साडेतीन पिठांपैकी एक शक्तीस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. येथे श्री आदीमाया, आदीशक्तीचे चैतन्य येत असल्याने ते टिकवून ठेवणे आणि त्याचा भाविकांना लाभ मिळावा, यासाठी या तीर्थक्षेत्री चालू असलेल्या धर्मशास्त्रावर आधारित रूढी, परंपरा आणि प्रथा पाळणे अत्यंत आवश्यक असते. तथापि शासननियुक्त प्रशासकीय अधिकार्‍यांकडून प्रथा, परंपरा मोडीत काढून त्यांच्या हस्ते हवे तसे भाविकांच्या दर्शनाचे आणि पूजेचे व्यवस्थापन केले जाते.

२. यात्राकाळात मुख्य प्रवेशद्वारातून पुढे कल्लोळ तीर्थ घेऊन श्री गणेशाचे दर्शन नंतर श्री तुळजाभवानीचे दर्शन असा धर्मशास्त्रात रूढ आहे. त्यामुळे देह आणि मन शुद्धी होऊन देवतांकडून येणारी शक्ती भाविकांना मिळते; पण दर्शनमार्ग इतर द्वारांतून गेल्याने भाविक कल्लोळ तीर्थ आणि श्री गणेशाचे दर्शन यांपासून वंचित रहातात. कल्लोळ तीर्थ हे स्वयंभू आणि ईश्‍वर संकल्पित आहेत. सध्या ते भाविकांना उपलब्ध होत नाही. भाविकांचा श्री गणेश दर्शनाचा आणि कल्लोळ तिर्थाचा लाभ प्रशासनाने हिराऊन घेतला आहे.

३. ११ एप्रिल या दिवशी चैत्र पौर्णिमा उत्सवाच्या वेळी ५ ते ६ लाख भक्तांनी महाद्वारातून आणि कल्लोळ तीर्थातून दर्शनाचा लाभ घेतला. त्या वेळी ४० होमगार्ड आणि काही मंदिर समितीचे कर्मचारी यांनी महाद्वाराबाहेर भाविकांना सोडण्याचे नियोजन केले. मात्र नवरात्रीच्या काळात महाद्वारातून दर्शन मार्ग बंद करून गैरसोयीच्या आणि धर्मपरंपरा तोडणार्‍या मार्गातून प्रवेश दिला जातो. त्या वेळी केवळ २ ते ३ लाख भाविक असतात. त्यामुळे चैत्र पौर्णिमेला जर महाद्वारातून दर्शनासाठी सोडण्याचे नियोजन होते, तर नवरात्रीत का नाही ?

४. मंदिर समितीचे अधिकारी आणि पोलीस अधिकारी बूट घालून कल्लोळ तिर्थाच्या पुढे जाऊन परिसरात फिरत असतात अन् मंदिराचे पावित्र्य भंग करतात. त्यामुळे धार्मिक भावनाही दुखावल्या जातात. अशा कृती अत्यंत अशोभनीय आणि काळिमा फासणार्‍या आहेत.

५. मातंगी द्वारातून भाविकांना बाहेर पडतांनाचा मार्ग अत्यंत अरूंद असल्याने कमालीचे हाल होतात. तेथे अतिक्रमण झाल्याने रस्ते अरूंद झाले आहेत. ते अतिक्रमण काढून रस्ता रूंद केल्यास विनासायास भाविकांना जाता येईल.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *