Menu Close

मंदिरांत साकडे घालण्याचा उपक्रम म्हणजे हिंदु राष्ट्र येण्यासाठी हिंदूंनी देवाकडे केलेली आर्त आळवणी !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम

मलकापूर (कोल्हापूर) येथे श्री दत्तात्रेयांच्या चरणी साकडे !

मलकापूर : वरूल (मलकापूर) येथील दत्त उपासक श्री. दादा करमरकर यांच्या घरी ११ मे या दिवशी श्री दत्ताला साकडे घालण्यात आले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने या वेळी प्रवचनही घेण्यात आले. समितीचे सर्वश्री प्रसाद कुलकर्णी, सुधाकर मिरजकर यांसह ३५ जिज्ञासू या वेळी उपस्थित होते. जिज्ञासूंनी धर्मशिक्षणवर्ग चालू करण्याची मागणी केली.

जळगाव येथील ग्रामदैवत प्रभु श्रीरामचंद्रांच्या चरणी हिंदुत्वनिष्ठांकडून साकडे !

जळगाव : येथील ग्रामदैवत प्रभु श्रीरामचंद्रांच्या चरणी ११ मे या दिवशी हिंदुत्वनिष्ठांनी साकडे घातले. हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री मोहन तिवारी, दीपक राजपूत, दिनेश शिंपी, प्रमोद बारी, गजानन तांबट, रवींद्र सपकाळे, संदीप लोंढे, अविनाश चव्हाण, राहुल तळेले, मयुर भदाणे, ओमप्रकाश जोशी, प्रणव नागणे यांच्यासह अन्य भाविक उपस्थित होते.

मिरज (सांगली) येथे श्री अंबामातेच्या चरणी साकडे !

मिरज : येथील मंगळवार पेठ येथील श्री अंबाबाईदेवीच्या मंदिरात परात्पर गुरु डॉ. आठवले यांना उत्तम आरोग्य लाभावे, यासाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली आणि हिंदु राष्ट्र स्थापनेतील अडथळे दूर होण्यासाठी देवीला साकडे घालण्यात आले. या वेळी ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती सत्यभामाबाई (माई) वायचळ यांनी भावपूर्णरित्या प्रार्थना सांगितली. या वेळी सनातन संस्थेच्या साधिका डॉ. (श्रीमती) मृणालिनी भोसले यांच्यासह मंदिरातील भक्तगण प्रशांत वायचळ, प्रदीप वायचळ, सौ. लता वायचळ, श्रीमती माळवदे, श्री. महादेव चौगुले, सौ. चौगुले, सौ. भारती नाईक, सौ. मंजुळा व्यंकटेश नाईक, सौ. वर्षा राजेंद्र काकडे, श्री. चंद्रकांत मळवाडे उपस्थित होते. या वेळी प्रार्थना करतांना सनातन संस्थेच्या साधिका डॉ. (श्रीमती) भोसले यांनी, ‘देवीची मुद्रा प्रसन्न वाटत आहे आणि देवीकडे पाहून भाव जागृत झाला’, असे सांगितले. (साधकांना येणार्‍या अनुभूती या त्यांच्या वैयक्तिक भावामुळे येतात. त्या इतरांना येतीलच असे नाही ! – संपादक, दैनिक सनातन प्रभातअ)

हिंदूंची आर्त हाक देवापर्यंत पोहोचत आहे !

हिंदूंच्या सर्व समस्यांना एकच उत्तर, ते म्हणजे लवकरात लवकर हिंदु राष्ट्र येणे होय. हिंदु राष्ट्र लवकरात लवकर येण्यासाठी हिंदूंनी भावभक्ती वाढवणे आवश्यक आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने राबवण्यात येणार्‍या विविध उपक्रमांद्वारे हिंदूंना हेच सांगण्यात येत आहे. या उपक्रमाच्या अंतर्गत भारतात ठिकठिकाणी हिंदू मंदिरांमध्ये जाऊन सामूहिक प्रार्थना करत आहेत. आपण देवाकडे सातत्याने काहीतरी मागतच असतो; मात्र या उपक्रमाच्या अंतर्गत धर्मनिष्ठ हिंदू स्वतःसाठी काही न मागता व्यापक अशा हिंदु राष्ट्रासाठी साकडे घालतांना दिसतात. ही अभिनव अशी गोष्ट आहे. काही मंदिरांमध्ये पुरोहितांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासाठी धार्मिक विधी करणार असल्याचे सांगितले, तर काही ठिकाणी साकडे घालतांना हिंदुत्वनिष्ठांना अनुभूतीही आल्या. यावरून ‘साकड्यांच्या माध्यमातून हिंदूंची हिंदु राष्ट्र येण्याविषयीची आर्त हाक देवापर्यंत पोहोचत आहे’, असेच म्हणावे लागेल.

लातूर येथे पावन हनुमान मंदिर आणि कालिकादेवी मंदिर येथे स्वच्छता अभियान अन् साकडे

लातूर : येथील नारायणनगरमधील पावन हनुमान मंदिर आणि जुना औसा रोड येथील कालिकादेवी मंदिर या ठिकाणी सनातन संस्थेच्या वतीने मंदिर स्वच्छता अभियान राबवण्यात आले, तसेच सनातन संस्थेचे प्रेरणास्रोत परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त त्यांना दीर्घायुष्य लाभावे, हिंदु राष्ट्र निर्माण व्हावे, यांसाठी तेथे साकडेही घालण्यात आले.

या वेळी सौ. अरुणा कुलकर्णी, सौ. सुवर्णा मिरजकर, सौ. मीना बारस्कर, सौ. दुर्गा बारस्कर, मीना पोतदार, सौ. पद्मजा वालवडकर, केताली कुलकर्णी, साक्षी मिरजकर, ओगलेकाकू, जयस्वालकाकू, वावरे आजी, सौ. कुलकर्णी आणि परिसरातील महिलांनी सहभाग नोंदवला. कालिकादेवी मंदिर समितीचे अध्यक्ष प्रकाश महामुनी यांनीही या कामासाठी सहकार्य केले.

साकडे घालतांना हिंदू करत असलेली भावपूर्ण प्रार्थना !

‘भारतासह संपूर्ण पृथ्वीवर हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी, तसेच सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचा महामृत्यूयोग टळावा, त्यांचे प्रकृतीस्वास्थ्य उत्तम रहावे, सर्व हिंदु धर्माभिमान्यांचे आपत्काळात रक्षण व्हावे, त्यांच्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रासांचे निवारण होऊन आध्यात्मिक उन्नती व्हावी, तसेच महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय कार्यान्वित व्हावे’, ही प्रार्थना.

बडनेरा, अमरावती येथील दत्तमंदिरात साकडे !

अमरावती : झिरी, बडनेरा येथील हिंदूंनी श्री दत्तमंदिरासह एकूण ७ ठिकाणी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी साकडे घातले. या वेळी मंदिरातील पुरोहितांनी स्वतः दत्तात्रेयाला प्रार्थना केली.

हिंदु राष्ट्र जागृती अभियानात हिंदू कशा प्रकारे सहभागी होऊ शकतात ?

१. मंदिरांचे विश्‍वस्त आणि पुजारी

अ. हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी भाविकांकडून सकाळी आणि संध्याकाळी सामूहिक प्रार्थना करवून घेणे

आ. ‘हिंदु राष्ट्र जागृती अभियाना’च्या अंतर्गत उपक्रम राबवण्यासाठी मंदिरातील जागा उपलब्ध करून देणे

२. सामाजिक कार्यकर्ते आणि अधिवक्ते

अ. नागरिकांसाठी ‘माहिती अधिकार कार्यशाळां’चे आयोजन करणे

आ. हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी अधिवक्त्यांचे संघटन व्हावे, यासाठी ‘अधिवक्ता शिबिरे’ आयोजित करणे

(यांसाठी संपर्क : श्री. अभय वर्तक – ७७७५८५८३८७)

मलकापूर (जिल्हा कोल्हापूर) येथे ग्रामदैवत श्री नरसिंहदेवाच्या चरणी हिंदुत्वनिष्ठांचे साकडे !

मलकापूर : येथील ग्रामदैवत नरसिंह देवतेला साकडे घालण्यात आले. ९ मे या या दिवशी असलेल्या श्री नरसिंह जयंतीचे औचित्य साधून पुरोहित श्री. श्रीवर्धन जोशी यांनी साकडे घातले. सकाळी ८ वाजता देवतेची पूजा, षोड्षोपचार पूजा आणि सत्यनारायण पूजा घालण्यात आली. या वेळी हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री सुरेश कोणवले, नंदू कोणवले, विलास देशमाने, सुरेश पोतदार, हिंदु जनजागृती समितीचे प्रसाद कुलकर्णी, सुधाकर मिरजकर यांसह २५ हून अधिक हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते. यावेळी सर्वांनी भावपूर्ण प्रार्थना केली.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या दीर्घायुष्यासाठी विष्णुसहस्र नामाचे पठण करणार असल्याचे सांगणारे पुरोहित श्री. वामन जोशी !

या वेळी उपस्थित पुरोहित श्री. वामन जोशी यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना दीर्घायुष्य मिळावे आणि सनातन धर्माचा प्रचार विश्‍वभर व्हावा, यासाठी सेवा म्हणून विष्णुसहस्र नामाचे पठण आणि यज्ञ करणार असल्याचे सांगितले. साकडे घालण्याच्या या उपक्रमाला समाजातून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *