नगर : परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आरंभलेल्या ‘हिंदु राष्ट्र जागृती अभियाना’च्या अंतर्गत ९ मे या दिवशी श्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील श्री शनैश्वरदेवाच्या चरणी हिंदुत्वनिष्ठांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी साकडे घातले.
हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे प्रकृतीस्वास्थ्य उत्तम रहाण्यासाठी प्रारंभी मंदिरात श्री शनिदेवाच्या प्रतिकात्मक मूर्तीसमोर सर्व हिंदुत्वनिष्ठांनी अभिषेक करून संकल्प केला. त्यानंतर श्री शनिदेवांची आरती करण्यात आली.
त्याच वेळी उपस्थित शनिभक्त आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी श्री शनिदेवांच्या साक्षीने हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कटिबद्ध रहाण्याची प्रतिज्ञा केली. या वेळी बजरंग दलाचे श्री. संतोष पंडुरे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. ठाणगे बापू, श्री. प्रसाद शेंडगे, शनिशिंगणापूरचे सरपंच श्री. बाळासाहेब बानकर, शनिशिंगणापूर युवा मंचाचे युवक आणि येथील ग्रामस्थ, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट, कु. प्रियांका लोणे, रणरागिणी शाखेच्या महाराष्ट्र संघटक कु. प्रतीक्षा कोरगांवकर यांसह पंचक्रोशीतील हिंदुत्वनिष्ठ युवक उपस्थित होते.
श्री शनैश्वरदेवाच्या चरणी हिंदुत्वनिष्ठांनी केलेली प्रार्थना
भारतासह संपूर्ण पृथ्वीवर विश्वकल्याणार्थ हिंदु राष्ट्र स्थापन व्हावे, तसेच सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचा महामृत्यूयोग टळावा, त्यांचे प्रकृतीस्वास्थ्य उत्तम रहावे, सर्व हिंदु धर्मनिष्ठांचे आपत्काळात रक्षण व्हावे, अशी संकटनिवारक श्री शनैश्वरदेवाच्या चरणी प्रार्थना !
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात