पंढरपुरात वारकर्यांसह हिंदुत्वनिष्ठांचे आंदोलन !
गोशाळा हिंदु जनजागृती समितीला सांभाळण्यास द्या ! बाबासाहेब बडवे, माजी शहराध्यक्ष, भाजप, पंढरपूर
पंढरपूर (जिल्हा सोलापूर) : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या गोशाळेतील गायींच्या मृत्यूस उत्तरदायी असणार्या सर्वांवर कठोर कारवाई केली जावी, या मागणीसाठी शनिवार, १३ मे या दिवशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात वारकर्यांसह हिंदु जनजागृती समितीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात वारकरी संप्रदायासह ७५ हिंदुत्वनिष्ठ उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. ‘‘गोशाळा तुम्हाला सांभाळता येत नाही, त्यामुळे ती हिंदु जनजागृती समितीला सांभाळण्यास द्या’’, अशी मागणी भाजपचे माजी शहराध्यक्ष श्री. बाबासाहेब बडवे यांनी या आंदोलनाच्या वेळी केला.
या प्रसंगी हिंदुत्वनिष्ठांनी व्यक्त केलेल्या भावना
१. वारकरी संप्रदाय पाईक संघाचे राष्ट्रीय प्रवक्ता ह.भ.प. रामकृष्ण महाराज वीर या वेळी म्हणाले, ‘‘कसायाला जी शिक्षा असते, तीच शिक्षा येथील मंदिर समितीच्या उत्तरदायी अधिकार्यांना द्यायला हवी; कारण ते कसाईच झाले आहेत.’’
२. हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक श्री. मनोज खाडये या वेळी म्हणाले, ‘‘मंदिर समितीची गोशाळा सांभाळण्याची पात्रता नाही, तसेच हिंदूंची मंदिरेही सांभाळण्याची यांची क्षमता नाही.’’
३. श्रीशिवप्रतिष्ठानचे हिंदुस्थान विभाग प्रमुख श्री. प्रतापसिंह साळुंखे म्हणाले, ‘‘मंदिर समितीच्या गायी जेव्हा उकिरड्यावर चरत असतात, तेव्हा त्याचा जाब नगरपालिकेऐवजी मंदिर समितीच्या व्यवस्थापकांनाच विचारायला हवा. रायगडावर ३ आणि ४ जून या दिवशी ‘बत्तीस मणांचे सिंहासन’ उभारण्याचा कार्यक्रम होणार आहे, त्या वेळी पू. संभाजीराव भिडेगुरुजींना हा गंभीर प्रकार सांगून श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने हा विषय धसास लावला जाईल.’’ ह.भ.प. बाबूराव महाराज वाघ, सनातन संस्थेच्या साधिका सौ. अनिता बुणगे, भाजपचे श्री. विजय बडवे यांनीही या वेळी परखड विचार मांडले.
आंदोलनाचा प्रारंभ वारकरी संप्रदाय संघटक ह.भ.प. बाबूराव महाराज वाघ यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून करण्यात आला. ‘जनम जनम का नाता है, गोमाता हमारी माता है ।’, ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।’, ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो’, ‘हिंदु जनजागृती समितीचा विजय असो’ या घोषणांनी पंढरपूरकरांचे लक्ष वेधले. या वेळी आंदोलनातील सहभागी हिंदुत्वनिष्ठांनी विविध मागण्यांचे फलक हाती धरले होते. हे फलक नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. आंदोलनाचे सूत्रसंचालन सनातनचे साधक डॉ. श्रीपाद पेठकर यांनी केले.
आंदोलनात उपस्थित अन्य मान्यवर
ह.भ.प. अनिल महाराज बडवे, भाजपचे माजी शहराध्यक्ष श्री. बाबासाहेब बडवे, पंढरपूर नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षा सौ. सुजाता बडवे, हिंदु महासभेचे शहराध्यक्ष श्री. बाळासाहेब डिंगरे, सर्वश्री विवेक बेणारे, महेश खिस्ते, आेंकार घोडके, श्याम हिप्परकर, शिवसेना शहर प्रमुख श्री. वैभव बडवे, परशुराम युवा मंचचे श्री. श्रीराम बडवे, पेशवा युवा मंचचे सचिव श्री. गणेश लंके, घोंगडी ग्रामोद्योग व्यापारी श्री. प्रमोद सादिगले, सामाजिक कार्यकर्ते श्री. अनिल सप्ताळ, श्री. रोहन सूर्यवंशी, पुरोहित संघाचे श्री. विद्याधर वांगीकर, बजरंग दलाचे शहरप्रमुख श्री. सुनील बाबर, विश्व हिंदु परिषदेचे श्री. रामेश्वर कोरे, मंगळवेढा येथील माजी उपनगराध्यक्ष श्री. सुरेश जोशी, प्रतिष्ठित व्यापारी अरुण बट्टेवार यांसह मोठ्या संख्येने हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले होते.
या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या मागण्या
१. गोशाळेतील गायींचे मृत्यू आणि त्यांची होणारी हेळसांड यांसाठी उत्तरदायी असणार्या सर्वांवर कठोर कारवाई करण्यात यावी
२. गोशाळेकडे अक्षम्य दुर्लक्ष करणार्या व्यवस्थापकांना हटवून गोशाळेचे व्यवस्थापन पारदर्शी आणि गोमातेची सेवा चांगल्या प्रकारे करू शकतील, अशा गोभक्त भाविकांकडे द्यावे.
३. यापुढे गोशाळेतील गायींची हेळसांड होणार नाही, यासाठी विविध उपाययोजना कराव्यात. त्या सर्व योजना भाविकांना समजण्यासाठी गोशाळेच्या बाहेरील दर्शनीय भागात फलकावर लावाव्यात.
प्रशासनाला देण्यात येणार्या निवेदनात म्हटले आहे की,
१. आतापर्यंत या गोशाळेमध्ये अनेकदा नियमबाह्य कृती करणे, गायींची हेळसांड करणे यांसारख्या अनेक घटना घडत आहेत. गोशाळेला गायी, तसेच त्यांच्या संगोपनासाठी देणगी मिळते, तसेच मंदिर समिती गोशाळेसाठी वेगळे अर्पणही गोळा करते; मात्र त्याचा वापर योग्यप्रकारे होत नसल्याने गोशाळेच्या मूळ उद्देशाला हरताळ फासला जात आहे.
२. मंदिर समितीच्या दुर्लक्षामुळे गोशाळेतील अनेक गायींचा मृत्यू ओढवला आहे. या गोशाळेतील गायींना योग्य प्रकारचा चारा मिळावा, यासाठी मंदिर समितीने विविध ठेके दिले आहेत. असे असतांना अनेकदा गायींना चारा मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. चार्याअभावी गावातील उकिरड्यावरील कचरा खाल्ल्याने गायींच्या पोटात प्लास्टिकच्या पिशव्या आणि अन्य घातक पदार्थ मोठ्या प्रमाणात जाऊन काही गायींचा मृत्यू झाल्याचे गंभीर प्रकार घडले आहेत.
३. माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार मृत्यू झालेल्या गायींच्या पोटात १४ ते १५ किलो प्लास्टिक, तसेच लोखंडी तारेचे गोळे मिळाले, अशी माहिती प्राप्त झाली आहे. गोपालनासाठी पुरेसे अर्पण भाविकांनी देऊनही गायींना योग्य खाद्य उपलब्ध न झाल्यामुळे त्या मृत्यूमुखी पडतात, हे अक्षम्य आहे. गोपालनाच्या दृष्टीने त्यांना पुरेसा चारा उपलब्ध करून देता न येणे, हा मंदिर समितीच्या गलथान आणि भ्रष्टाचारी कारभाराचा नमुना आहे. देवनिधीमध्ये होणारा असा अपहार हे एक महापापच आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात