मध्यप्रदेशमध्ये ‘हिंदु राष्ट्र जागृती अभियान’
उज्जैन (मध्यप्रदेश) : धर्मशिक्षणामुळे मुसलमानांना ‘जीवनात काय करायचे आहे’, याची दिशा स्पष्ट आहे. त्यामुळे संपूर्ण जगात इस्लामचे राज्य आणायचा ते प्रयत्न करत आहेत. हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यामुळे ‘जीवनात काय करायचे’, हे त्यांना स्पष्ट नाही. खाऊन-पिऊन झोपणे, या चार्वाक तत्त्वज्ञानाच्या ते आधीन झाले आहेत. लॉर्ड मेकॉलेच्या शिक्षणपद्धतीमुळे असे झाले आहे. त्यामुळे धर्मशिक्षण देणार्या गुरुकुल व्यवस्थेचा पुन्हा प्रारंभ केला पाहिजे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केले. ते परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने चालू असलेल्या ‘हिंदु राष्ट्र जागृती अभियान’च्या अंतर्गत आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. ‘हम हिंदुस्थानी’ आणि हिंदु जनजागृती समिती यांनी संयुक्तपणे येथील किड्डू सिटी प्ले या शाळेत या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सुमित व्यास यांनी केले.
पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी उपस्थित केलेले अन्य सूत्रे
१. हिंदु धर्माचे शत्रू हिंदूंच आहेत. जो धर्माचरण करत नाही, तो अज्ञानी आहे. लॉर्ड मेकॉलेचे शिक्षण घेऊन जे भोगवादी आणि सेक्युलर बनले, ते हिंदू धर्माचेही शत्रू बनले. त्यामुळे हिंदूंचे अध:पतन होत आहे.
२. मुसलमानांना धर्माचे शिक्षण देण्याची व्यवस्था राज्यघटनेत आहे; परंतु हिंदूंना धर्मशिक्षण देण्याची व्यवस्था राज्यघटनेत का नाही ?
३. येणार्या काळात होणारे युद्ध धर्म-अधर्माचे युद्ध आहे. अधर्माला धर्मच हरवू शकतो.
४. समर्थ रामदास स्वामी – छत्रपती शिवाजी महाराज, भगवान कृष्ण-पांडव आणि चाणक्य – चंद्रगुप्त मौर्य यांच्या उदाहरणावरून स्पष्ट आहे की, जेव्हा ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज एक होते तेव्हा धर्मसंस्थापनेचे कार्य सहजपणे होते. आज याच दोन्ही तेजांची हिंदूंना आवश्यकता आहे. ही दोन्ही तेज धर्माचरणाने प्राप्त होते.
५. वर्ष १९९७ मध्ये २०२५ पर्यंत काय काय होईल ?, याविषयी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी वेळोवेळी सांगितले होते. साधनेने त्रिकाल ज्ञान प्राप्त होते. परात्पर गुरुदेवांनी जे सांगितले, त्याप्रमाणेच आज घडतांना दिसून येत आहे. यावरून त्यांच्या द्रष्टेपणाचा अनुभव आम्ही साधक घेत आहोत.
क्षणचित्र
पू. डॉ. पिंगळे यांचे मार्गदर्शन सर्व जण मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते. व्याख्यानानंतर जिज्ञासूंनी शंकांचे निरसन करून घेतले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात