कराड येथे मंदिर स्वच्छतेच्या उपक्रमाला विश्वस्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सातारा : परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्ताने मंदिर स्वच्छता करण्यात आली. या वेळी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने वारुंजी गावातील श्री विठ्ठल मंदिर येथे स्वच्छता करण्यात आली. याला स्थानिक धर्माभिमानी आणि मंदिर विश्वस्त यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मंदिर स्वच्छतेनंतर श्री विठ्ठलचरणी हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी आणि परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांना दीर्घायुष्य लाभण्यासाठी प्रार्थना करण्यात आली. सामूहिक प्रार्थनेनंतर सनातनच्या साधिका सौ. उज्वला वडणगेकर यांनी ‘साधना आणि हिंदु राष्ट्र’ या विषयावर प्रवचन घेतले.
तारापूर आणि विक्रोळी येथे तीन मंदिरांची स्वच्छता
मुंबई : हिंदु राष्ट्र जागृती अभियानाच्या अंतर्गत हिंदूसंघटन होऊन हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या कार्याला भगवंताचा आशीर्वाद मिळून त्यास गती प्राप्त व्हावी, या नि:स्वार्थ भावाने मुंबई येथील तारापूर परिसरातील पानलामाता मंदिर आणि शिव मंदिर, तसेच विक्रोळी येथील शिव मंदिर येथे मंदिर स्वच्छता अभियान राबवण्यात आले.
जळगाव जिल्ह्यात विविध ठिकाणी हिंदु राष्ट्र जागृती अभियानांतर्गत मंदिर स्वच्छता उपक्रम !
मंदिर स्वच्छतेनंतर प्रथमच भावजागृती झाल्याची पुजार्यांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया
जळगाव : शहरातील श्री दत्तमंदिर आणि गणपति मंदिर या ठिकाणी मंदिर स्वच्छता घेण्यात आली. मंदिराच्या पुजर्यांनीही स्वच्छतेत सहभाग घेतला, तसेच ‘आम्ही नेहमी स्वच्छता करतो; पण असा सात्त्विक भाव जागृत होत नाही. तुमची सेवा पुष्कळ चांगली आहे’, असे सांगितले.
नांद्रा येथील श्रीराम मंदिराचीही स्वच्छता करण्यात आली. या वेळी सौ. प्रतिभा पाटील, सौ. अर्पणा पाटील या स्थानिक महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. वाघोदा येथील ग्रामदैवत मरीमातेच्या मंदिराची हिंदवी स्वराज्य सेनेच्या साहाय्याने स्वच्छता करण्यात आली. त्यानंतर देवीचे पूजन आणि सामूहिक आरती झाली. १५ धर्माभिमान्यांनी यात सहभाग घेतला. या वेळी ‘हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ हा विषय मांडण्यात आला. जवळपासच्या सर्व गावांतील मंदिरांची स्वच्छता होण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली.
हिंदुत्वनिष्ठ आणि दैनिकाचे वर्गणीदार यांच्या पुढाकाराने मंदिर स्वच्छता !
कवठेमहांकाळ (जिल्हा सांगली) : हिंदु राष्ट्र जागृती अभियानाच्या अंतर्गत येथील श्री गणेश मंदिर, तसेच श्री मारुति मंदिर यांची स्वच्छता करण्यात आली. या उपक्रमात दैनिक सनातन प्रभातचे वर्गणीदार आणि हिंदुत्वनिष्ठ यांचा उत्स्फूर्त सहभाग होता. या वेळी दोन्ही मंदिरांचा परिसर स्वच्छ करण्यात आला. या उपक्रमात वाचक श्री. आकाश पवार, श्री दिलीप सगरे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. राजू गोरे, श्री. वैभव सगरे, हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री संतोष माळी, महेश मोरे, विकास माळी, तसेच हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि सनातन संस्थेचे साधक उपस्थित होते.
अमरावती येथे मंदिर स्वच्छता अभियानाच्या उपक्रमात लोकप्रतिनिधींचा सहभाग !
अमरावती : खडकारीपुरा येथील श्री एकविरादेवी मंदिरासह एकूण ८ ठिकाणी मंदिर स्वच्छता करण्यात आली. त्यामध्ये भाजपच्या नगरसेविका सौ. संगीता बुरंगे, शिवसेनेच्या सौ. सुनिता येवतकर, काँग्रेसच्या महिला जिल्हाप्रमुख सौ. रश्मी उपाध्ये यांनी स्वच्छतेमध्ये सहभाग घेतला. प्रत्येक ठिकाणी मंदिर स्वच्छता झाल्यावर तेथे पुष्कळ चैतन्य जाणवत असल्याचे उपस्थितांनी सांगितले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात