न्यूयॉर्क : श्रीराम, श्री हनुमान इत्यादी हिंदूंच्या देवतांचे विडंबन करणारे अमेरिकास्थित गमाया आस्थापनाचे गमाया लेजन्ड् नावाचे व्हिडिओ गेम बाजारातून तातडीने हटवण्यात यावे, अशी मागणी फोरम फॉर हिंदु अव्हेकनिंगने गमाया आस्थापनाकडे केली आहे.
हिंदूंसाठी पूजनीय असलेल्या देवतांचा खेळामध्ये वापर करणे अयोग्य आहे. त्यामुळे लहान मुलांमध्ये हिंदु देवतांविषयीची आदराची भावना नष्ट होईल, असे फोरम फॉर हिंदु अव्हेकनिंगने गमाया आस्थापनला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. गमाया आस्थापनाने फोरम फॉर हिंदु अव्हेकनिंगच्या पत्राला अद्याप कुठलाच प्रतिसाद दिलेला नाही.
या पत्रात म्हटले आहे..
१. श्रीराम, श्री हनुमान यांचा उल्लेख आदरपूर्वक करण्यात आलेला नाही.
२. खेळामध्ये देवतांचा वापर करणे हे देवतांचे विडंबनच होय. देवतांचे मानवीकरण करणे अयोग्य आहे.
३. श्री हनुमान त्याची शक्ती दाखवण्यासाठी स्वत:भोवती जोराने फिरतांनाचा प्रसंग विडंबनात्मकरित्या दाखवण्यात आला आहे.
४. देवतांचे अलंकार, शस्त्रे इत्यादी वैशिष्ट्ये अशास्त्रीय दाखवण्यात आली आहेत.
५. श्रीराम, श्री हनुमान यांचा खेळणी असा उल्लेख करण्यात आला आहे.
६. या व्हिडिओ गेममुळे लहान मुलांच्या मनामध्ये हिंदु देवतांविषयी विडंबनात्मक प्रतिमा निर्माण होईल आणि देवतांविषयी श्रद्धा वाढण्यास अडथळा येईल. देवतांची देवघरामध्ये किंवा मंदिरामध्ये पूजा केली जाते आणि त्यांच्या अस्तित्वाची अनुभूती घेतली जाते.
धर्माभिमानी हिंदू पुढील ई-मेल पत्त्यावर निषेध नोंदवत आहेत.
ई-मेल : [email protected]
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात