मुलांनो (साधकांनो) ! तुमचे गुरु कोण आहेत ? स्वामी चिरंजीवी (स्वामी म्हणजे त्रिभुवनाचे स्वामी आणि चिरंजीवी म्हणजे ज्यांचे कार्य शाश्वत आणि अमर आहे.), सनातन धर्माचे उद्धारक असे तुमचे गुरु आहेत. सनातन धर्माचे उद्धारक गुरु तुम्हाला लाभले असल्यामुळे त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळणारच आहे. तुम्ही केवळ त्यांच्यावर श्रद्धा ठेवा. साक्षात् वैकुंठामध्ये जो श्रीविष्णु आहे, क्षीरसागरामध्ये जो श्रीविष्णु आहे, तो श्रीविष्णु म्हणजेच परात्पर गुरु डॉॅ. आठवले आहेत.
पृथ्वीवर अनेक आश्रम, संत, संन्यासी आणि गुरु आहेत. अशा अनेक आश्रमांकडे अमाप धनसुद्धा आहे; परंतु परात्पर गुरु डॉ. आठवले, हे एकमेव असे गुरु आहेत, ज्यांच्यासाठी हे सप्तर्षि जीवनाडीपट्टीचे वाचन होत आहे. केवळ तेच एकमेव आहेत, ज्यांच्यासाठी सप्तर्षींना इतके सर्व लिखाण करावे, असे वाटते. इतर कोणत्याही आश्रमासाठी किंवा गुरूंसाठी सप्तर्षींनी इतक्या मोठ्या प्रमाणात लिखाण केलेले नाही. असे होण्यामागे काहीतरी दैवी कारण असणार. याचा सर्व साधकांनी विचार करायला हवा. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासारखे गुरु लाभणे, हा सनातनच्या साधकांसाठी वरप्रसादच आहे !
परात्पर गुरु डॉ. आठवले आणि ईश्वर वेगळे नसून एकच आहेत. जे त्यांच्या जवळ आले आहेत आणि त्यांनी सांगितलेल्या साधनामार्गानुसार साधना करत आहेत, अशांनी गुरूंवर १०० टक्के श्रद्धा ठेवावी. ज्यांनी गुरूंवर श्रद्धा ठेवली आहे, त्यांचे कोणतेही कार्य कधीही अपूर्ण रहाणार नाही आणि ज्यांची श्रद्धा डळमळीत आहे, त्यांचे कार्य कधीही पूर्ण होणार नाही ! ज्या साधकांची गुरूंवर १०० टक्के श्रद्धा आहे, असे साधकच त्यांना प्रिय आहेत. सनातनच्या प्रत्येक साधकाकडे आम्हा महर्षींचे सतत लक्ष आहे आणि त्यांची गुरूंवर किती श्रद्धा आहे ?, याकडेसुद्धा आमचे लक्ष आहे.
आम्ही सनातनच्या सर्व साधकांना सांगू इच्छितो की, त्यांच्यासाठी त्यांचे गुरु परात्पर गुरु डॉ. आठवले, हेच सर्वकाही आहेत. सर्वांनी नेहमी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविना अन्य कोणताही देव अथवा अन्य कुणीही आम्हाला ठाऊक नाही, असा भाव ठेवावा. असे ध्येय साधकांनी ठेवले, तर जगामध्ये सनातनच्या साधकांचीसुद्धा कीर्ती होणार आहे.
आजच्या दिवशी आम्ही सप्तर्षि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी प्रार्थना करतो, साधकांकडून अनेेक चुका झाल्या आहेत. काही साधकांनी तुम्हाला नावेही ठेवली आहेत, तरीही या साधकांच्या सर्व अपराधांना तुम्ही क्षमा करा ! हे श्रीविष्णु, हे परमात्मा, हे वैकुंठातील तिरुमला, हे वीर राघवा, हे शिवा आणि हे ब्रह्मदेव असलेल्या गुरुदेवा, तुम्हाला आम्ही प्रार्थना करतो, सर्व साधकांचे तुम्ही रक्षण करावे. त्यांच्या मनोवांच्छित इच्छा तुम्ही पूर्ण कराव्यात. त्यांच्या चुका तुम्ही क्षमा करून त्यांना अध्यात्माच्या मार्गावर पुढे घेऊन जावे !
(सप्तर्षि जीवनाडी वाचन क्र. १२७ (९.५.२०१७, रात्री ८.४५))
– पू. डॉ. ॐ उलगनाथन्, तिरुवण्णामलई, तमिळनाडू.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात