Menu Close

हिंदु राष्ट्र जागृती अभियानातील उपक्रमांमुळे जिज्ञासूंना राष्ट्र आणि धर्म कार्य करण्याची संधी !

रामनाथ (अलिबाग) येथील अधिवक्त्यांच्या बैठकीत राष्ट्र आणि धर्म जागृतीच्या कार्यात सहभागी होण्याचा अधिवक्त्यांंचा निर्धार

मध्यभागी श्री. अभय वर्तक आणि उपस्थित अधिवक्ते

रायगड : येथील श्री विठ्ठल मंदिराच्या सभागृहात हिंदु राष्ट्र जागृती अभियानाच्या अंतर्गत स्थानिक अधिवक्त्यांंची बैठक आयोजित केली होती. बैठकीला ११ अधिवक्ते आणि सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक उपस्थित होते. रायगड जिल्ह्याचे हिंदु जनजागृती समितीचे समन्वयक श्री. नरेंद्र सुर्वे यांनी बैठकीचा उद्देश स्पष्ट केला. या वेळी राष्ट्र आणि धर्म जागृतीच्या कार्यात सहभागी होण्याचा अधिवक्त्यांंनी निर्धार केला. श्री. अभय वर्तक यांनी उपस्थितांना राष्ट्र आणि धर्म यांची सद्यस्थिती, तसेच व्यष्टी आणि समष्टी साधना अन् सर्व समस्यांवरील हिंदु राष्ट्र हा एकमेव उपाय यांविषयी मार्गदर्शन केले. हिंदु विधीज्ञ परिषदेची आतापर्यंतची वाटचाल आणि परिषदेने हाती घेतलेल्या मोहिमा यांची माहिती देण्यात आली.

ईश्‍वरी कार्यात सहभागी होण्यासाठी केलेल्या आवाहनाला अधिवक्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

हिंदु राष्ट्रातील या कार्यात सर्वांचा सहभाग आवश्यक आहे. कायदेशीर साहाय्याची आवश्यकता लागल्यास अधिवक्त्यांनी ईश्‍वरी कार्यात आपला सहभाग द्यावा, असे आवाहन करण्यात आले. आवाहनाला प्रतिसाद देत अनेक अधिवक्त्यांनी राष्ट्र आणि धर्म जागृतीच्या कार्यात सहभागी होण्याची सहमती दर्शवली. रायगड जिल्ह्यातील काही समस्या मांडण्यात आल्या आणि त्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी संघटितपणे प्रयत्न करण्याचे ठरवण्यात आले, तसेच प्रत्येक मासाला बैठक घेण्याचेही सर्वांनी निश्‍चित केले.

विशेष

बैठकीसाठी अधिवक्ता श्री. श्रीराम ठोसर यांनी सर्व अधिवक्त्यांना निमंत्रण देऊन आवर्जून येण्यास सांगितले. अधिवक्ता श्री. अमित देशमुख आणि अधिवक्ता श्री. दिगंबर राणे हे शहराबाहेर असूनही तेथून घरी न जाता थेट बैठकीला आले.

चिते पिंपळगाव (जिल्हा संभाजीनगर) येथील धर्माभिमान्यांचा सप्ताहातून एकदा धर्मशिक्षणासाठी एकत्र येण्याचा निर्धार

सभेला संबोधित करतांना श्री. सुनील घनवट आणि त्यांच्या उजवीकडे ह.भ.प. गावंडे महाराज

संभाजीनगर : येथील चिते पिंपळगाव गावातील श्री हनुमान मंदिराच्या पटांगणात हिंदु राष्ट्र जागृती सभेचे आयोजन केले होते. या वेळी ह.भ.प. रामनाथ महाराज गावंडे आणि हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र संघटक श्री. सुनील घनवट यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सभेनंतर धर्माभिमान्यांनी सप्ताहातून एकदा धर्मशिक्षणासाठी एकत्र येण्याचा निर्धार केला.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे काळानुसार योग्य कार्य ! – ह.भ.प. रामनाथ महाराज गावंडे

ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांनी मावळ्यांचे संघटन करून हिंदवी स्वराज्य स्थापिले, त्याचप्रमाणे आपण राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यासाठी एकत्र येणे, ही काळाची आवश्यकता आहे. काळानुसार योग्य ते कार्य आज सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या माध्यमातून होत आहे.

राष्ट्र आणि धर्म यांसाठी सिद्ध होऊया ! – श्री. सुनील घनवट

संभाजीनगरसारख्या अतीसंवेदनशील जिल्ह्यात इसिस या आंतरराष्ट्रीय आतंकवादी संघटनेचे जाळे गावागावांत पसरले आहे. त्यामुळे आपण सर्वांनी संघटित रहाणे, ही काळाची आवश्यकता आहे. क्रांतीकारकांनीही आपल्या देशासाठी सर्वस्वाचा त्याग केला. त्याचप्रमाणे आपणही देव, देश आणि धर्म यांसाठी आपल्याकडे जे आहे, ते अर्पण करण्यास सिद्ध होऊया.

क्षणचित्रे

१. उपस्थित वक्त्यांचा सत्कार गावातील स्वराज्य प्रतिष्ठानचे श्री. जयदीप वाघमारे यांनी केला.

२. हिंदु राष्ट्र स्थापन होईपर्यंत कृतीशील रहाण्याची सर्वांनी प्रतिज्ञा केली.

वैशिष्ट्यपूर्ण

१. सभेचा प्रसार गावातील धर्माभिमानी युवकांनी केला.

२. आढावा बैठकीला २० हून अधिक धर्माभिमानी उपस्थित होते.

३. सभेनंतर झालेल्या आढावा बैठकीत गावाजवळच्या ५ गावांमध्ये मंदिर स्वच्छता राबवण्याचे धर्माभिमान्यांनी ठरवले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *