नंदुरबार : येथील महाराणा प्रताप आणि छत्रपती शिवाजी महाराज यांंचे पुतळे, तसेच सप्तश्रृंगी माता मंदिर आणि माँ दुर्गा भवानी मंदिर यांची स्वच्छता करण्यात आली.
१. ८ मे या दिवशी महाराणा प्रताप जयंतीच्या पूर्वसंध्येला शहरातील महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याची स्वच्छता करून नगर परिषदेच्या सहकार्याने पाण्याचा बंब लावून पुतळा धुण्यात आला.
२. शहरातील श्री सप्तश्रृंगी माता मंदिरही स्वच्छ करण्यात आले. या वेळी शिवसेना वाहतूक सेनेचे जिल्हा प्रमुख श्री. जितेंद्र राजपूत यांच्यासह हिंदु जनजागृती समितीचे डॉ. नरेंद्र पाटील, मयूर चौधरी, सौ. कल्याणी बंगाळ, भावना कदम यांनी सहभाग घेतला.
३. ९ मे या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, तसेच चौपाळा या गावातील माँ दुर्गा भवानी मंदिर यांची स्वच्छता करण्यात आली. परिसरातील सर्व भाविकांना मंदिर स्वच्छतेची माहिती देण्यात आली. येथील भक्तांनीही कृतीशील सहभाग घेतला. गावातील माजी सरपंच श्री. लालचंद राठोड, संत दगाजीबापू ट्रस्टचे श्री. पंडित महाजन यांनीही सहकार्य केले. या वेळी सनातन संस्थेच्या भावना कदम आणि हिंदु जनजागृती समितीचे डॉ. नरेंद्र पाटील उपस्थित होते.
क्षणचित्र : चौपाळा येथे ७८ वर्षीय महिलेने मंदिर स्वच्छता अभियानात सहभाग घेतला.
मंदिर स्वच्छता अभियानात सहभागी होणे, हे धर्मकर्तव्य !
हिंदूंची मंदिरे ही चैतन्याचा स्रोत आहेत. हा स्रोत टिकवून ठेवला, तर मंदिरांचे पावित्र्य, मांगल्य टिकून रहाते. अशा जागृत मंदिरांमध्ये गेल्यास आपोआप भावजागृती होते. त्यामुळे आपल्या आजूबाजूला असलेल्या मंदिरांची स्वच्छता करण्यास सहकार्य करणे, हे हिंदूंचे धर्मकर्तव्यच आहे. हल्ली प्रशासकीय यंत्रणांकडून मंदिरांच्या देखभालीकडे दुर्लक्ष केले जाते. मंदिरांकडेही देखभालीसाठी पुरेसा निधी नसतो. त्यामुळे त्यांच्या नित्य स्वच्छतेसाठी अडचणी येतात. या पार्श्वभूमीवर हिंदूंनी असे उपक्रम राबवल्यास त्यांना ईश्वराचा नक्कीच आशीर्वाद मिळेल !
समाजातील महनीय व्यक्ती किंवा इतर राजकारणी अथवा कलाकार हे त्यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने स्वतःला केंद्रभूत ठेवून कार्यक्रम आयोजित करतात; मात्र राष्ट्र आणि धर्म यांसाठी अहोरात्र झटणारे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले हे मात्र असे काही न करता हिंदुत्वनिष्ठांना राष्ट्र आणि धर्म यांसाठी कृती करण्यासाठी प्रेरणा देतात. त्यांच्या कृपेमुळेच या उपक्रमांना सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. यासाठी त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करू, तेवढी अल्पच !
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात