पुणे : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील पांडवनगर भागातील पुणे महानगरपालिका वसाहतीमध्ये १० मे या दिवशी शौर्यजागरण शिबीर पार पडले. त्यामध्ये वसाहतीमधील एकूण ३६ महिला आणि पुरुष सहभागी झाले होते. शिबिरानंतर येथील काही तरुणांनी उत्स्फूर्तपणे त्वरित स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्ग चालू करण्याची मागणी केली.
शिबिरातील सादर केलेले उपक्रम आणि मार्गदर्शन
१. या शिबिरात मर्दानी खेळांचे प्रशिक्षक आणि हिंदुत्वनिष्ठ श्री. कुंडलिक कचाले अन् लहान वयापासून ते शालेयवयीन मुलांपर्यंत सहभागी असलेल्या युवकांच्या समूहाने उत्स्फूर्तपणे लाठीकाठी आणि दांडपट्टा यांची प्रात्यक्षिके दाखवली.
२. समितीचे श्री. विजय चौधरी यांनी शौर्यजागरण – ही काळाची आवश्यकता आणि शौर्यजागरणाचे महत्त्व यांविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
३. त्यानंतर समितीप्रणीत रणरागिणी शाखेच्या कु. क्रांती पेटकर यांनी स्वसंरक्षण प्रशिक्षण का घ्यायला हवे ?, याविषयी प्रभावी मार्गदर्शन केले.
४. या मार्गदर्शनानंतर समितीच्या कार्यकर्त्यांनी एकत्रितरित्या स्वसंरक्षणाविषयी काही प्रात्यक्षिके दाखवली.
वैशिष्ट्यपूर्ण
१. हे शिबिर गार्गी फाऊंडेशनचे श्री. विजय गावडे आणि अमरज्योत मित्र मंडळाचे सदस्य कु. आर्य गावडे यांनी आयोजित केले होते. तसेच त्यांनी शिबिराची सिद्धता केली होती.
२. शिबिर झाल्यानंतर अनेक महिलांनी सांगितले की, शौर्यजागरणाचा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून प्रत्येकाने स्वसंरक्षण प्रशिक्षण शिकायला हवे. येथे महिलांसाठी नियमित प्रशिक्षण दिले, तर आम्ही येऊ आणि अन्य महिलांनाही एकत्रित करू.
३. एका साडेचार वर्षांच्या मुलाने लाठीकाठीचे प्रात्यक्षिक दाखवले. ते पाहून उपस्थित सर्वांना स्वतः ते शिकले पाहिजे, असे वाटले.
४. श्री. विजय गावडे यांच्या आईंनी सांगितले की, मी माझ्या नातीला स्वसंरक्षण प्रशिक्षण शिकण्यासाठी तुमच्या वर्गात पाठवीन.
क्षणचित्र
या वेळी सनातन निर्मित सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात