Menu Close

मुळेगाव (जिल्हा सोलापूर) येथील मे. सोनांकुर एक्सपोर्ट प्रा.लि. हे अनधिकृत पशूवधगृह बंद करण्याचा शासनाचा निर्णय !

हिंदु जनजागृती समिती, हिंदुत्वनिष्ठ संघटना, प्राणीमित्र संघटना आणि पर्यावरणप्रेमी नागरिक यांच्या लढ्याचा ऐतिहासिक विजय !

महाराष्ट्रातील अनधिकृत पशूवधगृहे शासनाने तात्काळ बंद करावीत ! – हिंदु संघटनांची मागणी

हिंदुत्वनिष्ठांनी मागणी केल्यानंतर निर्णय घेणार्‍या शासनाने अनधिकृत पशूवधगृह स्वतःहून बंद करणे अपेक्षित आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

डावीकडून श्री. केतन शहा, श्री. मनोज खाडये, श्री. विलास शहा, श्री. महेश भंडारी, श्री. अप्पासाहेब पाटील\

सोलापूर : जिल्ह्यातील मुळेगाव येथील ‘मे. सोनांकुर एक्सपोर्टस् प्रा.लि.’ हे पशूवधगृह पर्यावरणाला अत्यंत घातक असतांना गेली १० वर्षे शासनाचे अनेक नियम आणि कायदे धाब्यावर बसवून अनधिकृतपणे चालू होते. या विरोधात वारंवार तक्रारी करूनही यापूर्वीच्या काँग्रेस सरकारने या प्रकरणी काही कारवाई केली नाही. या विरोधात हिंदु जनजागृती समितीने जनआंदोलन उभारले आणि डिसेंबर २०१६ च्या महाराष्ट्र विधीमंडळाच्या नागपूर अधिवेशनात ‘धरणे आंदोलन’ केले होते. यानंतर समितीने या प्रकरणाचा शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. तसेच स्थानिक ग्रामस्थ आणि प्राणीमित्र संघटनांनीही या विरोधात शासनाकडे दाद मागितली. परिणामी पर्यावरणाला घातक ठरलेले हे पशूवधगृह अखेर १२ मे २०१७ या दिवशी शासनाने बंद करण्याचा निर्णय घेतला. याविषयी हिंदु जनजागृती समितीने १९ मे या दिवशी घेतलेल्या  परिषदेत याविषयी सर्वांना अवगत केले.

हिंदु जनजागृती समिती, हिंदुत्वनिष्ठ संघटना, प्राणीमित्र संघटना आणि पर्यावरणप्रेमी नागरिक यांच्या संयुक्त लढ्यामुळे मिळालेला हा ऐतिहासिक विजय आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे पश्‍चिम महाराष्ट्र समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी पत्रकार परिषदेत केले. हिंदु जनजागृती समिती आणि ‘पीपल फॉर अ‍ॅनिमल वेलफेअर’ यांनी संयुक्तरित्या घेतलेल्या पत्रकार परिषदेत सोलापूरचे ‘मानद पशूकल्याण अधिकारी’ श्री. विलास शहा, ‘पीपल फॉर अ‍ॅनिमल वेलफेअर’चे अध्यक्ष श्री. महेश भंडारी, सचिव पंडीत महावीर शास्त्री, मुळेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. अप्पा पाटील, भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष केतन शहा आणि हिंदु जनजागृती समितीचे पश्‍चिम महाराष्ट्र समन्वयक श्री. मनोज खाडये आदी उपस्थित होते.

या वेळी पत्रकारांना माहिती देतांना श्री. खाडये यांनी सांगितले की, या आदेशानुसार ७२ घंट्यांच्या आत वीज आणि पाणी पुरवठा बंद झाला असल्याची निश्‍चिती प्रत्यक्ष पशूवधगृहाच्या ठिकाणी जाऊन करणार आहोत. तसेच संबंधित खात्याच्या अधिकार्‍यांनाही भेटणार आहोत.

या पशूवधगृहामुळे मुळेगावसह अनेक गावांतील सहस्रो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. पशूवधगृहात होणार्‍या प्राण्यांच्या कत्तलीमुळे सर्वत्र प्रचंड दुर्गंधी पसरून हवेचे प्रदूषण होणे, विहिरींच्या पाण्याचे प्रदूषण होणे, तसेच स्थानिक तीर्थक्षेत्रांचे पावित्र्य धोक्यात येणे, अशा समस्या निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे लोकांचे जगणे असह्य झाले होते. वर्ष २००७ पासून मानद पशूकल्याण अधिकारी श्री. विलाश शहा, मुळेगावचे ग्रामस्थ आणि अन्य संघटना या पशूवधगृहाच्या विरोधात लढा देत आहेत. अनेक आंदोलने करण्यात आली; मात्र आर्थिक शक्तीच्या जोरावर आणि काही राजकारण्यांना हाताशी धरून हे प्रकरण १० वर्षे दाबण्यात आले होते.

पशूवधगृहाने प्रारंभीपासूनच शासनाची घोर फसवणूक केली असल्याचे उघडकीस

१. मुळेगाव ग्रामपंचायतीकडून इमारत बांधकामासाठी खोटी अनुज्ञप्ती (परवाना) घेणे.
२. शासनाच्या अनेक विभागांची अनुज्ञप्ती न घेणे.
३. हवा-पाणी यांचे प्रदूषण करून कायदा मोडणे.

आदी अनेक प्रकार केलेले आहेत, तसेच सोलापूर जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेने या गावांतील पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा अहवालही दिला होता. तरी यापूर्वीच्या शासनाने सोनांंकुर पशूवधगृहावर कारवाई का केली नाही, या पशूवधगृहाला कोणी अभय दिले, हेही फडणवीस सरकारने शोधून काढले पाहिजे.

१२ मे या दिवशी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने सोनांंकुर पशूवधगृह बंद करण्याचा आदेश दिला आहे. आदेशात म्हटले आहे की,

१. सदर पशूवधगृहात जैविक कचरा टाकण्याची यंत्रणा कार्यान्वित नसणे, इंधनपद्धत अनुमती न घेता परस्पर पालटणे, सेंट्रल ग्राऊंड वॉटर अथॉरिटीचे ना-हरकत प्रमाणपत्र नसणे, ईटीपी प्रकल्पातून बाहेर टाकण्यात येणारे द्रव्य ठरवून दिलेल्या मानांकापेक्षा अधिक हानीकारक असणे, स्थानिक नागरिकांकडून प्रदूषण होत असल्याच्या अनेक तक्रारी येणे आदी अनेक कारणांमुळे पर्यावरणाला गंभीर धोका निर्माण झालेला आहे. त्यामुळे हे पशूवधगृह बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

२. त्याचप्रमाणे ७२ घंट्यांच्या आत या पशूवधगृहाचा वीज आणि पाणी पुरवठा खंडित करण्याचे आदेशही संबंधित शासकीय यंत्रणांना देण्यात आलेले आहेत.

पशूवधगृहासंबंधी लक्षात आलेल्या गंभीर गोष्टी

१. पशूवधगृहामध्ये काम करतांना कर्मचारी मृत पावल्यामुळे न्यायालयाने २५ सहस्र रुपयांचा दंड ठोठावलेला आहे.

२. नुकतेच २ बांगलादेशी घुसखोर या पशूवधगृहात सापडले आणि सोलापूर पोलिसांनी त्यांना अटकही केलेली आहे. उद्या अशा घुसखोरांनी राज्यात काही घातपात केल्यास त्याचे दायित्व कोण घेणार, हा प्रश्‍न निर्माण होत आहे.

पत्रकार परिषदेत करण्यात आलेल्या मागण्या…

१. हे प्रकरण अत्यंत गंभीर असून याची सखोल चौकशी व्हावी, यासह अशा प्रकारे अनधिकृत आणि कायदाद्रोही कृत्ये करणारी, पर्यावरणाला घातक ठरणारी, शासनाची अनुमती न घेता चालवण्यात येणारी राज्यातील सर्व पशूवधगृहे शासनाने तातडीने बंद करावीत.

२. अनधिकृत पशूवधगृहे चालवणार्‍यांवर गुन्हा नोंद करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी.

३. अशा पशूवधगृहांवर अंकुश ठेवण्यासाठी ‘विशेष पथके’ नेमावीत आणि शोध मोहीम राबवावी.

४. पशूवधगृहावर तात्काळ कारवाई न करणार्‍या संबंधीत तत्कालीन अधिकार्‍यांवर गुन्हे नोंद करावेत.

पत्रकार परिषदेमध्ये विचारलेले प्रश्‍न आणि श्री. मनोज खाडये यांनी दिलेली उत्तरे

प्रश्‍न : तुमची पुढील दिशा काय असणार आहे ?

उत्तर : राज्यभरातील सर्वत्र असलेली अनधिकृत पशूवधगृहे बंद करून संबंधितांवर आणि त्याला पाठिंबा देणार्‍या राजकारण्यांवर कारवाई व्हावी, यासाठी लढा अधिकाधिक तीव्र करणार आहोत.

प्रश्‍न : सोनांकुर पशूवधगृह हे अधिकृत पशूवधगृह असल्याचे सांगितले जात होते; मग तुम्ही याला अनधिकृत कसे म्हणता ?

उत्तर : तपासामध्ये असे सिद्ध झाले आहे की, गेली १० वर्षे सर्व नियम आणि कायदे धाब्यावर बसवून हा व्यवसाय चालू होता. असा पर्यावरण नियंत्रण मंडळाचा अहवालही सादर झालेला आहे. यावरून अनधिकृत पशूवधगृह चालवणार्‍यांचा खोटारडेपणा सिद्ध झाला आहे.

प्रश्‍न : महाराष्ट्रातील अनधिकृत पशूवधगृहांची माहिती तुमच्याकडे आहे काय ?

उत्तर : महाराष्ट्र पर्यावरण नियंत्रण मंडळाने २००९ मध्ये सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात १४३ पशूवधगृहे अनधिकृत असल्याचे म्हटले आहे.

प्रश्‍न : या अनधिकृत पशूवधगृहांवर बंदीचे आदेश दिल्यानंतर आणखी कोणावर नेमकेपणाने कारवाई व्हावी, असे तुम्हाला वाटते ?

अनधिकृत पशूवधगृह चालवणारे, पशूवधगृह अनधिकृत असल्याचे लक्षात आणून देऊनही त्यांना पाठीशी घालणारे, तसेच ज्यांचे त्यांच्याशी आर्थिक आणि राजकीय हितसंबंध आहेत, अशांवर फडणवीस सरकारने कठोर कारवाई करावी.

हिंदु जनजागृती समितीने केलेल्या सहकार्यामुळेच हे यश प्राप्त झाले !

मानद पशूकल्याण अधिकारी विलाश शहा यांनी या यशानंतर व्यक्त केलेली प्रतिक्रिया

मी आणि अनेक संघटनांनी गेल्या १० वर्षांपासून विविध माध्यमांतून लढा दिला. यामध्ये न्यायालयीन लढा, आंदोलने, निवेदने, लोकप्रतिनीधींना भेटणे, प्रशासकीय अधिकार्‍यांना भेटणे अशा अनेक प्रकारे सातत्याने प्रयत्न केले; परंतु जेव्हा सोलापूर येथे झालेल्या हिंदु जनजागृती समितीच्या जाहीर हिंदु धर्मजागृती सभेत पशूवधगृहाचा विषय घेतला. त्यानंतर हिंदु जनजागृती समितीने हा विषय प्राधान्यक्रमावर घेऊन जो लढा उभा केला, त्यामुळेच हे यश प्राप्त झाले. या यशामागे दैवी शक्ती कार्यरत असून ती दैवी शक्ती दुसरी कोणी नसून परात्पर गुरु डॉ. आठवलेच आहेत, याची खात्री पटली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *