शनिशिंगणापूर येथे ग्रामसभा
श्रीशनिशिंगणापूर विश्वस्त निवडींविरोधात ग्रामस्थ एकवटले !
श्री शनैश्वर देवस्थान बचाव कृती समिती स्थापन
श्री क्षेत्र शनिशिंगणापूर : श्री शनिशिंगणापूर देवस्थान विश्वस्तांची निवड पूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या मर्जीतील झाली असून या निवडीच्या विरोधात संपूर्ण गाव एकवटले आहे. २६ जानेवारी या दिवशी झालेल्या ग्रामसभेत सरपंच श्री. बाळासाहेब बानकर यांच्या अध्यक्षतेखाली सर्वानुमते ठराव मांडून तो संमत करण्यात आला. (राजकारण्यांपेक्षा भक्तांची विश्वस्त म्हणून नेमणूक व्हावी, यासाठी झटणार्या शनिशिंगणापूर ग्रामस्थांचे अभिनंदन ! – संपादक) यामध्ये विश्वस्त मंडळ विसर्जित (बरखास्त) करून प्रशासकाची नेमणूक करावी आणि नव्याने विश्वस्त मंडळ निवडावे, अशी मुख्य मागणी करण्यात आली आहे. या मागणीसाठी ५०० हून अधिक ग्रामस्थांनी स्वाक्षर्यांची चळवळ राबवली आहे. यासाठी राज्यशासनाकडे दाद मागण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे. त्यावर पर्याय म्हणून श्री शनैश्वर देवस्थान बचाव कृती समितीची स्थापना करण्यात आली आहे. तिच्या अध्यक्षपदी अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष आणि राज्य संपर्कप्रमुख श्री. संभाजी दहातोंडे यांची ग्रामसभेत ठरावानुसार निवड करण्यात आली.
ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. बाळासाहेब बानकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत त्यांच्या अनुमतीने श्री. दत्तात्रय परशुराम शेटे यांनी मांडलेल्या ठरावात म्हटले आहे की, श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर देवस्थान न्यासाच्या विश्वस्त मंडळाच्या वर्ष २०१६-२०२० या कालावधीच्या निवडी नुकत्याच झाल्या आहेत. त्या संबंधी अनेक तक्रारी प्रविष्ट असून त्यात अनेक त्रुटी आहेत. राजकीय नेत्यांनी आपल्या हितसंबंधातील व्यक्तींची विश्वस्त मंडळावर नेमणूक करून त्यांच्या हातून मर्जीप्रमाणे कारभार चालू केलेला आहे. त्यामुळे आताचे विश्वस्त मंडळ तात्काळ विसर्जित करून प्रशासकाची नेमणूक व्हावी. त्याचसमवेत आता निवडलेले विश्वस्त हे सामाजिक अथवा धार्मिक कार्यात नाहीत. तसेच वर्ष २०११ ते २०१५ या कालावधीतील विश्वस्त मंडळावर गैरकारभारामुळे न्यायालयात अनेक खटले प्रविष्ट आहेत. असे असतांना नगर येथील धर्मादाय आयुक्तांनी त्या विश्वस्तांचे नातेवाईक आणि हितसंबंधी यांना पुन्हा नवीन विश्वस्त मंडळावर नेमणूक करून भ्रष्टाचार आणि चुकीचे धोरण यांना प्रोत्साहन दिले आहे. त्यामुळे निवडप्रक्रिया पूर्ण चुकीची आणि दोषी असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात