पुणे : राष्ट्रविरोधी वक्तव्ये करणारा कन्हैय्या कुमार आणि देशद्रोही घोषणा देणार्यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढणारा शेहला रशीद यांना पुण्यात कार्यक्रम घेऊन बोलण्याची अनुमती देण्यात येऊ नये, अशा आशयाचे निवेदन पुण्यात पोलीस सहआयुक्त रवींद्र कदम आणि विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त संजयकुमार बाविस्कर यांना देण्यात आले.
या वेळी हिंदु एकता आंदोलनाचे श्री. शैलेंद्र दीक्षित, हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता श्री. प्रशांत यादव, ज्योतिषविशारद श्री. धुमाळगुरुजी, धर्माभिमानी सर्वश्री अरुण शुक्ल, सुरेंद्र कुमार कायत, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री कृष्णाजी पाटील, दीपक आगवणे, सनातनचे श्री. प्रवीण नाईक हे उपस्थित होते.
हिंदु जनजागृती समिती सनदशीर मार्गाने सर्व कार्य करते असे सांगितल्यावर पोलीस सहआयुक्त कदम म्हणाले, ‘‘सनदशीर मार्गानेच सर्व गोष्टी केल्या पाहिजेत. सदर अनुमती आम्हाला नाकारता येणार नाही; पण आम्ही योग्य खबरदारी नक्की घेऊ. काही कायदाबाह्य वक्तव्ये झाली, तर तात्काळ आम्ही संबंधितांवर कारवाई करू. तुमच्या नावातच जागृती आहे. तुम्ही जागृती करा.’’ संजयकुमार बाविस्कर यांनीही कारवाईचे आश्वासन दिले.
तहसीम पुनावाला यांनी २० मे या दिवशी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात